कमला मिल आग; २ हजार ७०६ पानांचे आरोपपत्र दाखल; आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:45 AM2018-03-01T03:45:29+5:302018-03-01T03:45:29+5:30
कमला मिल आग प्रकरणी बुधवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. पालिकेने सादर केलेल्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली, तसेच या प्रकरणातील अटक १२ आरोपींविरुद्ध बुधवारी २ हजार ७०६ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : कमला मिल आग प्रकरणी बुधवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. पालिकेने सादर केलेल्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली, तसेच या प्रकरणातील अटक १२ आरोपींविरुद्ध बुधवारी २ हजार ७०६ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कमला मिलमध्ये २८ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला. या प्रकरणी वन अबव्ह वन अबव्हचे क्रिपेश संघवी, जिगर संघवी, अभिजीत मानकर आणि मोजोस ब्रिस्टोचे मालक युग तुली, युग पाठक यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली. यापैकी १२ जणांविरुद्ध बुधवारी २ हजार ७०६ पानांचे आरोपपत्र भोईवाडा न्यायालयात दाखल केले आहे. यात २७१ जणांचे जबाब नोंदविण्यात आले. यातील आरोपी राजेंद्र पाटील यांच्यावर प्रशासकीय मंजुरीनंतर आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी दिली.
पालिकेने एन. एम. जोशी मार्ग पोलिससांत दाखल केलेल्या अहवालावरून पोलीस तपास सुरू आहे. याच अहवालावरून बुधवारी पालिकेच्या जी दक्षिण विभागाचे उपअभियंता दिनेश यशवंत महाले, अग्निशमन दलाच्या वरळी विभागाच्या सहायक अधिकारी संदीप शिवाजी शिंदे या दोघांचा अटक करण्यात आली.