#KamalaMillsFire - अग्नितांडवासाठी 'ड्रीम गर्ल'ने मुंबईच्या लोकसंख्येला धरले जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 04:18 PM2017-12-29T16:18:33+5:302017-12-29T16:22:16+5:30
भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी कमला मिल कंपाऊंडमधील अग्निदुर्घटनेचे खापर मुंबईतील वाढत्या लोकसंख्येवर फोडले आहे.
मुंबई - भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी कमला मिल कंपाऊंडमधील अग्निदुर्घटनेचे खापर मुंबईतील वाढत्या लोकसंख्येवर फोडले आहे. पोलीस कर्तव्यात कसूर ठेवतात असं म्हणता येणार नाही. ते खरंतर उत्तम काम करतायत. पण या शहराची लोकसंख्या प्रचंड वाढलीयं. मुंबई शहर संपते तिथे लगेच दुसरे शहर सुरु होते. मुंबईचा अखंड विस्तार सुरुच आहे असे हेमा मालिनी यांनी पत्रकारांना सांगितले.
कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोजो आणि वन अबाव्ह या पब आणि रेस्टॉरंटमध्ये भडकलेल्या आगीमध्ये 14 जणांचा बळी गेला. सर्वच्या सर्व 14 मृत्यू नाका, तोंडात धुर जाऊन गुदमरल्यामुळे झाले.
मोठया शहरांमधील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण असले पाहिजे. प्रत्येक शहरांमध्ये लोकसंख्येवर मर्यादा असली पाहिजे. मर्यादेबाहेर लोकसंख्या वाढत असेल तर त्यांना परवानगी देऊ नये. त्यांना दुस-या शहरात पाठवावे असे हेमा मालिनी म्हणाल्या. हेमा मालिनी यांनी व्यक्त केलेल्या या मतांना असंवेदनशील ठरवून अनेकांनी त्यावर टीका केली आहे.
#mumbaifire
— Hemalatha (@Hemalathanarne) December 29, 2017
Shocking statement from Hema Malini ji. Madam please make some sensible statements. Over population has nothing to do with fire accident. See over the safety issues there & about closing of second exit, which is more imp and need necessary investigation.
महिनाभरात अग्नितांडवात 27 निष्पापांचा गेला बळी
वर्षाखेरीस मुंबईत छोट्या-मोठ्या आगी लागण्याचे सत्र पहायाला पहायला मिळाले. सुत्रांच्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात 2017 मध्ये दर महिन्याला सुमारे 10 ते 15 आगीच्या घटनांची नोंद होते. सातत्याने लागणार्या या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे आहे. साकीनाका खैरानी रोडवरील भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगार होरपळले. हादरवून सोडणा-या या घटनेनंतर आज लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत गुदमरून 15 जण जिवानिशी गेले. या आगीचे अशा अनेक दुर्घटना मुंबई शहर आणि उपनगरांत घडल्या असून, यात 27 जणांचा नाहक बळी गेला आहे.