#KamalaMillsFire : अधिकारी आणि हॉटेल मालकांच्या भ्रष्ट युतीमुळेच दुर्घटना - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 04:42 PM2017-12-29T16:42:20+5:302017-12-29T16:45:18+5:30
मुंबई : महापालिका अधिकारी आणि हॉटेल व क्लब चालकांच्या भ्रष्ट युतीमुळे मुंबई आणि परिसरात मृत्यूचा खेळ सुरु आहे. अशा घटनांसाठी जबाबदार असणा-यांवर कडक कारवाई झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. कमला मिल कंपाऊंडमधील आगीची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला जबाबदार असणा-यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात विविध दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. घटना घडल्यावर सरकार फक्त चौकशीचे आदेश देते, परंतु ठोस कारवाई होत नाही. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाहीत. कमला मिल कंपाऊंडमध्ये गेल्या काही दिवसांत फार मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि क्लब सुरु झाले आहेत. त्यातल्या अनेक क्लबमध्ये अनधिकृत बांधकामे असून अनेकांना अग्निशमन विभागाच्या परवानग्या नसल्याचे किंवा नियम डावलून परवानग्या दिल्याची माहिती मिळते आहे. ही अतिशय गंभीर बाब असून महापालिका अधिका-यांच्या वरदहस्ताशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार असणा-या अधिका-यांवरही कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, काल रात्री मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहे.