#KamalaMillsFire: वाढदिवसच ठरला तिचा ‘मृत्यूदिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 04:38 AM2017-12-30T04:38:15+5:302017-12-30T04:38:29+5:30

मुंबई : गिरगावातील ११ वी खेतवाडी येथील वास्तव्यास असलेल्या खुशबू भन्साळी (२८) हिचा वाढदिवसच मृत्यूदिन ठरल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

#KamalaMillsFire: Birthday only became her birthday | #KamalaMillsFire: वाढदिवसच ठरला तिचा ‘मृत्यूदिन’

#KamalaMillsFire: वाढदिवसच ठरला तिचा ‘मृत्यूदिन’

Next

मुंबई : गिरगावातील ११ वी खेतवाडी येथील वास्तव्यास असलेल्या खुशबू भन्साळी (२८) हिचा वाढदिवसच मृत्यूदिन ठरल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी रात्री खुशबूचे पती जयेश भन्साळी यांनी पत्नीच्या वाढदिवसाकरिता विशेष पार्टीचे आयोजन केले होते.
गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास खुशबू-तिचा पती आणि अन्य सहा जोडपी लोअर परळ येथील ‘वन अबव्ह’ या रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी रवाना झाली. मात्र दुर्दैवाने खुशबू आणि तिची मैत्रीण किंजल मेहता या दोघींनाही प्राण गमावावा लागला आहे, अशी माहिती खुशबूचे चुलत भाऊ धर्मेश शहा यांनी दिली. या दुर्घटनेदरम्यान तिचे पती तिच्यासोबत होते, मात्र ते सुखरूप आहेत. परंतु, वाढदिवसाच्याच दिवशी पत्नी दुरावल्याने पती जयेश यांना मानसिक धक्का बसला आहे.
खुशबूच्या कुटुंबीयांना खुशबूचे पती जयेश भन्साळी यांनी घडलेल्या प्रसंगाविषयी सांगितले की, खुशबू खूप आनंदात होती, सर्व मित्र-मैत्रिणींसोबत तिचा वाढदिवस साजरा होत होता. नुकताच केक कापून झाला होता, सेलीब्रेशन सुरू होते. इतक्यात आग लागल्याचे ऐकू आले आणि प्राण वाचविण्यासाठी सगळे धावू लागले. आमच्यासोबत असणाºया तीन मुली प्राण वाचविण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या, त्या वेळी बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ प्रचंड गर्दी झाली होती आणि जो-तो स्वत:ला वाचविण्यास जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्याचवेळी बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळाल्याने आम्ही निघालो, त्या वेळेस खुशबूही मागून येत असेल असे वाटल्याने बाहेर आलो. मात्र खाली आल्यावर खुशबू मागे नसल्याचे लक्षात येताच पुन्हा रेस्टॉरंटमध्ये गेलो. तोपर्यंत अग्निशमन दलाचे मदतकार्य सुरू झाले होते. सगळीकडे शोधूनही खुशबू सापडत नव्हती. अखेरीस गुरुवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास खुशबूला बाहेर काढण्यात आले. त्या वेळेस तिचा श्वास सुरू होता, अशी माहिती त्यांनी दिली. परंतु केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
>सर्वांची लाडकी खुशबू
खुशबूचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. भन्साळी कुटुंबीयांमध्ये सर्वांचीच लाडकी होती. ती खूप कमी वेळात सर्वांशी मैत्री करायची, त्यामुळे तिचे आपल्या आयुष्यात नसणे यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे तिची मैत्रीण (ब्युटिशियन) बेनी यांनी सांगितले.
>मयत खुशबूच्या आजोबांचा आक्रोश
वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या खुशबू मेहता-भन्साली या २८ वर्षीय नातीचा मृत्यू झाल्याचे समजताच बाबूलाल मेहता यांना शोक अनावर झाला. श्वास गुदमरून लोकांचा मृत्यू होत असेल, अशा हवेलाही जागा नसलेल्या ठिकाणी हॉटेलला परवानगी दिलीच कशी जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या नातीप्रमाणेच दुसºया कुणावरही अशी वेळ येऊ नये, म्हणून अशा हॉटेलला परवानगी देऊ नये, अशी मागणीही बाबूलाल मेहता यांनी केली आहे. ते म्हणाले की, माझी नात वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. मात्र सहज पेट घेतील, अशा बांबूंचे बांधकाम तिथे दिसले. पण आग लागल्यावर विझवण्याची सक्षम अग्निशामक यंत्रणा दिसली नाही. पोलीस आणि महापालिकेनेही त्याकडे दुर्लक्ष केले.
अशा प्रकारे सुरक्षेच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणाºया हॉटेलवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यानिमित्ताने केली आहे. शिवाय हवेलाही जायला जागा नसेल, अशा ठिकाणी हॉटेलला परवानगी देऊन लोकांच्या आयुष्याशी प्रशासनाने खेळू नये, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: #KamalaMillsFire: Birthday only became her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.