मुंबई : कमला मिल कम्पाउंडमधील वन अबाव्ह आणि मोजोस ब्रिस्टोल या हॉटेल्समध्ये लागलेल्या आगीप्रकरणी हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, कंम्पाउंडमधील बांधकामे आणि पब्सना परवानग्या देण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला असेल, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी आज कमला मिल कम्पाउंडमधील अग्नितांडव झालेल्या परिसराला भेट दिली.यावेळी ते म्हणाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, या हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. याचबरोबर, या अग्नितांडवात ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, अशा पाच पालिका अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला असेल, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कम्पाउंडमधील बांधकामे आणि त्यांना देण्यात आलेल्या परवानग्यांबाबत पाहणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
पाच अधिकारी निलंबित...मधुकर शेलार (पदनिर्देशित अधिकारी), महाले (सब इंजिनिअर), पडगिरे (वैद्यकीय आरोग्य अधिकारी), धनराज शिंदे (ज्युनिअर इंजिनियर), एस. एस. शिंदे (अग्निशमन अधिकारी) अशी निलंबित केलेल्या पाच अधिकाऱ्यांची नाव आहेत. मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीला यासंदर्भातील माहिती दिली आहे. तर, जी साऊथ वॉर्ड सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांची बदली करण्यात आली आहे.