#KamalaMillsFire : आगीची चौकशी आयुक्तांकडून नको, मुख्यमंत्र्यांची पालिकेच्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक : विखे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 02:31 PM2017-12-29T14:31:00+5:302017-12-29T19:11:58+5:30
राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या अधिपत्याखालील मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक चालवली आहे. मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल्सला आग लागून झालेल्या 14 जणांचे मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत.
मुंबई : राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या अधिपत्याखालील मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक चालवली आहे. मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल्सला आग लागून झालेल्या 14 जणांचे मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत. मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून, आणखी किती मुंबईकरांना आपले प्राण देऊन या अव्यवस्थेची किंमत मोजावी लागणार? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, मुंबई महापालिका ही देशातील सर्वाधिक भ्रष्ट महानगर पालिका असून, येथील भ्रष्ट व्यवस्थेमुळे असंख्य कर्त्या व्यक्तींचे अकाली बळी जाऊन त्यांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत, तर अनेकांच्या आयुष्याची स्वप्ने ऐन तरूणाईतच उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे कमला मिल अग्नितांडवाची मुंबई महापालिका आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या निर्णय अमान्य असून या घटनेसाठी सर्वप्रथम मुंबई महानगर पालिकाच जबाबदार आहे आणि त्याच महापालिकेच्या आयुक्तांकडून चौकशी करणे म्हणजे निव्वळ मलमपट्टी ठरेल.
संबंधित हॉटेलमालकांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु, या घटनेसाठी हॉटेलमालकांसोबतच महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत सारेच दोषी आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरूद्धही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी सुद्धा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. तसेच, मागील 2 वर्षात मुंबईत इमारत कोसळून व आगी लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या सर्वच घटनांची आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फतच चौकशी झाली पाहिजे, असेही म्हणाले.
मुंबईत सध्या असलेल्या हॉटेल्समधील सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला शिवसेनेला वेळ नाही आणि त्यांचे नेते रूफ टॉप हॉटेल्सचा बालहट्ट धरून बसले आहेत. कमला मील कंपाऊंडमधील हॉटेलदेखील छतावर होते आणि आग लागल्यावर खाली उतरायला जागाच नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला, हे शिवसेनेने ध्यानात घ्यावा असे सांगत त्यांनी यावेळी शिवसेनेवर निशाना साधला.