मुंबई- गुरूवारी रात्री मुंबईच्या कमला मिलमधील वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. क्लबमध्ये मोकळ्या जागेचा बेकायदा वापर होत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. तसंच जी साऊथ वॉर्ड सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांची बदली करण्यात आली आहे.
मधुकर शेलार (पदनिर्देशित अधिकारी), महाले (सब इंजिनिअर), पडगिरे (वैद्यकीय आरोग्य अधिकारी), धनराज शिंदे (ज्युनिअर इंजिनियर), एस. एस. शिंदे (अग्निशमन अधिकारी) अशी निलंबित केलेल्या पाच अधिकाऱ्यांची नाव आहेत. मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीला यासंदर्भातील माहिती दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी कमला मिलमधील घटनास्थळी भेट दिली. मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. निष्पापांच्या मृत्यूला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसंच दुर्लक्ष केल्याप्रकरणी जर मुंबई महापालिका दोषी आढळली तर त्यावरही कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.