#KamalaMillsFire: पालिका आणखी किती बळी घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:22 AM2017-12-30T02:22:06+5:302017-12-30T02:22:18+5:30
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज होत असताना सरते वर्ष मनाला चटका लावून जाणारे ठरले. कमला मिलची घटना भीषण होतीच. पण इमारत कोसळून, आगीच्या दुर्घटनेत, झाड, खड्डा, गटारात पडून वर्षभरात शंभरहून अधिक निष्पाप जीव मृत्युमुखी पडले.
शेफाली परब-पंडित
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज होत असताना सरते वर्ष मनाला चटका लावून जाणारे ठरले. कमला मिलची घटना भीषण होतीच. पण इमारत कोसळून, आगीच्या दुर्घटनेत, झाड, खड्डा, गटारात पडून वर्षभरात शंभरहून अधिक निष्पाप जीव मृत्युमुखी पडले. मात्र या प्रत्येक दुर्घटनेला प्रशासकीय यंत्रणांचा ढिसाळ कारभार, बेपर्वाई, निष्काळजीपणा जबाबदार असून ते आणखी किती जणांचे बळी घेणार, असा सवाल मुंबईकरांकडून उपस्थित होतो आहे. या अधिकाºयांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
>घाटकोपर इमारत दुर्घटनेचे १७ बळी
दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. यंदाच्या पावसाळ्यात घाटकोपरमधील सिद्धिसाई ही चार मजली इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. या इमारतीच्या तळमजल्यावरील असलेल्या प्रसूतिगृहात नूतनीकरण सुरू असताना खांब काढण्यात आल्याने इमारत कमकुवत होऊन कोसळली. राजकीय वजन वापरून येथे बदल करणाºया सुनील शितप याच्या बेकायदा बदलाबाबत तक्रार करूनही विभाग कार्यालयाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
>भेंडीबाजार दुर्घटनेचे ३४ बळी
भेंडीबाजार येथील ११७ वर्षे जुनी हुसैनी इमारत कोसळून ३४ जणांचा बळी गेला. या इमारतीचा सैफी बुºहाणी अपलिफ्टमेंट या ट्रस्टकडून पुनर्विकास होणार होता. मे २०१४ मध्ये हुसैनी इमारत पाडण्याची परवानगीही मिळाली होती.प्रत्यक्षात काम सुरू होण्यास झालेली दिरंगाई या रहिवाशांच्या जिवावर बेतली.
>आगीच्या दुर्घटना...
साकीनाका येथील भानू फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ मजूर होरपळून मृत्युमुखी पडले. या कारखान्याला फरसाण व्यवसायाचा परवाना नव्हता. नोंदणी केलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक कामगार त्या कारखान्यात होते. सिलिंडर्सचा जादा साठा आणि बेकायदा पोटमाळा, आगीच्या नियमांचे उल्लंघन अशा त्रुटी या आगीस जबाबदार ठरल्या
>बेकायदा बांधकामांचा धोका
मुंबईत दरवर्षी सरासरी साडेचार हजार आगीच्या घटना घडतात. कुर्ला येथील किनारा रेस्टॉरंट, अंधेरीचे मेडिकल स्टोअर, साकीनाका येथील फरसाण कारखाना आणि कमला मिल कंपाउंडमधील आग या सर्व घटनांमध्ये बेकायदा बांधकामेच आगीचा धोका वाढविण्यात कारणीभूत ठरल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.
>एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीत २३ मृत्यू
एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीची घटना एक अनपेक्षित धक्काच होता. पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात अफवा पसरून झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. हा पूल लष्कराकडून बांधला जात आहे. मात्र मुंबईतील ब्रिटिशकालीन पुलांची अवस्था, फेरीवाले, मुंबईतील गर्दी असे सर्वच प्रश्न यामुळे चर्चेत आले. तीन वर्षांपासून ठप्प असलेली फेरीवाल्यांना जागा वाटपाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.
>खड्डे, झाड, गटारात पडून बळी
पदपथांवरील झाडांची निगा राखली जात नसून तक्रारीनंतरही धोकादायक झाडे तोडण्यात येत नाहीत. याचा नाहक भुर्दंड मुंबईकरांना जीव गमावून चुकवावा लागत आहे. या वर्षी झाड पडून चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन दुर्घटना चेंबूरमध्येच घडल्या आहेत. मुलुंड येथे खड्ड्यामुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाला, तर पावसाळ्यात उघड्या गटारात पडून बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला.
>आगीचा धोका कायम
कमला मिल, व्हिक्टोरिया मिल कंपाउंड, मथुरादास मिल कंपाउंड या ठिकाणी अनेक रेस्टॉरंटमध्ये बेकायदा बांधकामे असून आगीचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. मात्र याबाबत तक्रार करूनही कारवाई सोडाच सर्व सुरळीत असल्याचा अहवाल अधिकारी देतात, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
>धुराचा वास, बघ्यांची गर्दी
कमला मिल कंपाउंड नेहमीच गजबजलेले असते. आजही या कंपाउंडमध्ये गर्दी होती, पण त्यात एक विषण्ण शांतता होती. कमला मिल कंपाउंडमधील अग्नितांडवात १४ जणांचा बळी गेल्यावर शुक्रवारी येथील अन्य कॉर्पोरेट कार्यालयांतील व्यवहारांचा वेग मंदावला होता.मध्यरात्री लागलेली आग तब्बल चार तासांनंतर विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले, पण ही इमारत काचेची असल्यामुळे धूर आतच कोंडून राहिला. त्यामुळे या इमारतीतला धूर बाहेर पडावा यासाठी इमारतीच्या काही काचा फोडण्यात आल्या. या परिसरात धुराचा वास भरून राहिला होता. आगीमुळे या इमारतीतील सर्व विद्युत पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद ठेवण्यात आला होता.
>कमला मिल कंपाउंड आगीत १४ मृत्यू
लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमधल्या हॉटेल वन अबव्ह व मोजोस पबला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आगीत गुदमरून १४ जणांचा मृत्यू झाला. त्यात ११ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. या प्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेच्या पाच अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. क्लबमध्ये मोकळ्या जागेचा बेकायदा वापर होत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका या अधिका-यांवर ठेवण्यात आला आहे. जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांची बदली करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
>कमला मिल कंपाउंडमधील घटना अत्यंत दु:खद आहे. मी कमला मिल परिसरात काम करत असल्यामुळे येथील रेस्टॉरंट्स आणि पबमध्ये वारंवार जाणे होते. येथे हुक्क्यासाठी कोळसा जाळण्यात येत असल्यामुळे आगीची घटना या कारणामुळे होण्याची शक्यता आहे. कारण कोळसा जाळून तेथेच टाकला जातो. त्यामुळे अग्नितांडव झाले असेल. संबंधित हॉटेल, पबमध्ये अग्निसुरक्षेची व्यवस्था नव्हती. आग लागल्यावर आपत्कालीन सूचना देणारी यंत्रणादेखील लावण्यात आली नाही. या घटनेमधील दोषी लोकांविरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच राजकीय नेत्यांनी एकमेकांवर दोष-प्रत्यारोप करणे थांबविणे गरजेचे आहे. त्याऐवजी आपल्या शहरातील अग्नी सुरक्षा आणि इतर सुरक्षा व्यवस्थेला बळकटी करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अजून किती जीव जाणार आहेत? मृत व जखमी परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे.
- विरेन एम. वेसूवाला, स्थानिक
काल रात्री ही घडलेली घटना अत्यंत दु:खद व अनपेक्षित आहे. कमला मिलमध्ये माझे आॅफिस असल्याने या रेस्टॉरंटमध्ये वारंवार जाणे-येणे असते. हे ठिकाण मुंबईतील उत्कृष्ट डायनिंगसाठी प्रसिद्ध असल्याने येथे कधीही गर्दी असते. परंतु येथे कोणतीही सुरक्षेचे व्यवस्था नाही असे मी ठामपणे सांगू शकते.
- रीना कांबळे, स्थानिक
दररोज आॅफिसला जाताना मोठ्या प्रमाणात रहदारी असते. पण आज मात्र अग्निशामकच्या गाड्या, रुग्णवाहिका, पोलीस, वृत्तवाहिन्यांच्या गाड्या दिसून येत होेत्या. दुपारपर्यंत आगीचा धूर परिसरात पसरत होता. घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याकरिता जबाबदार असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. नियम धाब्यावर बसवून हॉटेल्स, रेस्टॉरंट उभे करूनदेखील पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. तसेच पार्टीला जाणाºया तरुणाईने देखील संबंधित हॉटेल किंवा पबच्या आपत्कालीन व्यवस्थेची व सुरक्षेची माहिती घेणे आवश्यक आहे.
- प्रशांत जाधव, स्थानिक