मुंबई : कुठे बर्थडे सेलिब्रेशन तर कुठे गाण्याच्या तालावर थिरकणा-या मंडळींची मजा मस्ती अचानक लागलेल्या आगीच्या धुरात कधी हरवली हे त्यांनाही कळले नाही. अंधारातून कुठे बाहेर पडायचे समजत नसल्याने गर्दीने एका वृत्तवाहिनीचे लिंक रूम गाठले आणि तोच त्यांच्यासाठी खरा आधार ठरला. तेथील सुरक्षारक्षक महेश साबळेने त्यांना समजावून पायपावरून उतरत ‘फायर एक्झिट’कडे धाव घेतली. मात्र तोही बाहेरून बंद. पाठून वाढणारी गर्दी अशात त्याने दरवाजा तोडूनमित्र सूरज गिरी आणि संतोष कोंडविलकर यांच्या मदतीने चिंचोळ्या वाटेतून २००हून अधिक जणांचे प्राण वाचविले. ऐनवेळी मदतीसाठी हे तीन सुरक्षारक्षक धावून आले नसते, तर हाच आकडा दुपटीने वाढला असता.वर्षभरापासून महेश ‘टाइम्स नाऊ’च्या लिंक रूममध्ये कार्यरत आहे. मित्र सूरज, संतोषही येथेच काम करतो. गुरुवारी हे तिघे सुरक्षारक्षक रात्रपाळीसाठी तैनात होते. त्यातील महेश साबळे यांनी सांगितले की, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तिसºया मजल्यावरील कार्यालयात बसलो होतो. तितक्यात रेस्टॉरंटमधील लोक आग लागल्याचे सांगत मदतीचा धावा करू लागले. मी तातडीने मदतीसाठी गेलो. मात्र दरवाजा बंद असल्याने नेमके काय करायचे ते कळत नव्हते. तितक्यात खाली ड्युटीवर असलेला सहकारी सूरज गिरी याला कॉल करून मदतीसाठी बोलावले. मात्र लोकांचा आवाज वाढल्याने अखेर दरवाजाचे लॉक तोडून आत शिरलो. आत भीतीच्या वातावरणात असलेल्या लोकांना तत्काळ बाहेर काढले. तितक्यात मदतीसाठी सुरज गिरी आले.गिरी यांनी सांगितले की, आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाला कॉल केला. वर गेलो तर महेश लोकांची सुटका करत होता. पबचे बाऊन्सर दिसत नव्हते. मदतीसाठी आमचा सहकारी संतोष कोंडविलकरलाही आम्ही बोलावून घेतले. महेश लोकांना बाहेर काढत होता, तर त्यांना खाली सुखरूप घेऊन घेण्याचे काम आम्ही दोघे करत होतो. ५०हून अधिक लोकांना या वेळी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आतील जखमी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे कामही केल्याचे गिरी यांनी सांगितले.संतोष यांनी सांगितले की, काही लोक सुखरूप खाली घेऊन गेलो. मात्र नातेवाईक वर अडकल्याने संबंधित लोकही पुन्हा वर जाण्यासाठी हट्ट करत होते. त्यांची समजूत काढण्याचे काम करत होतो. कुणी पत्नीसाठी तर कुणी भावंडांसाठी हाक देत होते. मात्र त्या सर्वांना धीर देताना सहकाºयांना मदत करण्याचे आव्हान पेलण्याची अनामिक ताकदही परिस्थितीनेच दिली.सूरजने नागरिकांच्या वृत्तीबाबत खंत व्यक्त केली. आम्ही नागरिकांचा जीव वाचवतोय. इथे अडकलेल्यांकडून प्लीज हेल्प... प्लीज हेल्प.. आवाज कानी पडतोय. मात्र अशावेळी जमलेल्या बघ्यांच्या गर्दीत कोणी हातात दारूचा ग्लास घेऊन उभा आहे तर कोणी व्हिडीओ काढण्यात दंग. अशा माणुसकी हरवलेल्यांकडून काय अपेक्षा करणार? असे मनात बोलून मीही त्यांना पुढे येण्याबाबत विनंती केली नाही. शक्य तेवढ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.
#KamalaMillsFire: ते सुरक्षारक्षक ख-या अर्थाने ठरले ‘रक्षक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 4:41 AM