Join us

नगरपरिषदेत कामबंद आंदोलन

By admin | Published: July 16, 2014 12:25 AM

राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता १ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर नगरपरिषद कर्मचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली मोर्चे काढण्यात आले होते

अलिबाग : राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता १ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर नगरपरिषद कर्मचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली मोर्चे काढण्यात आले होते. परंतु त्यास पंधरा दिवस उलटूनही शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने न.पा. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल वगळता उर्वरित आठ नगरपरिषदांतील ५९ टक्के म्हणजे ९६६ कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यात एकूण नऊ नगरपरिषदा असून त्यात एकूण १ हजार ६१३ कर्मचारी कार्यरत आहेत. मंगळवारपासून सुरु झालेल्या या संपात पनवेल नगरपरिषदेचे ३९० कर्मचारी सहभागी झालेले नाहीत. खोपोली नगरपरिषदेतील ४६८ कर्मचाऱ्यांपैकी ३८७, रोहा न.पा. मधील ७६ पैकी ७३, महाडमधील १०२ पैकी ९१, अलिबागमधील ९१ पैकी ८८, उरणमधील १८० पैकी १६५ तर माथेरानमधील १०० टक्के कर्मचारी संपावर असल्याने या नगरपरिषदांमध्ये नागरी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)