- मनोहर कुंभेजकरमुंबई- काँग्रेस सदस्यांची नुकतीच घोषणा झाली. मात्र मेरिटप्रमाणे या नेमणुका न करता यामधून कामत समर्थकांना डावलल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. मुंबई काँग्रेस कार्यकारिणीतून डावलल्याने माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गुरुदास कामत यांचे समर्थक आक्रमक झाले असून, त्यांनी आपली कैफियत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे मांडली आहे.
कामत हयात असताना ज्यांनी कामत यांना त्रास दिला आणि त्यांच्या विरोधात काम केले, त्यांना या नेमणुकांमध्ये झुकते माप दिल्याचा आरोप कामत समर्थकांनी लोकमतशी बोलताना केला. त्यामुळे कामत समर्थकांनी चक्क तीन पानी पत्रच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना इमेलद्वारे पाठवले असल्याची माहिती त्यांनी दिली. गुरुदास कामत यांचे गेल्या वर्षी 22 ऑगस्टला निधन झाले. कामत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेस पक्षाशी निष्ठावान राहून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात काँग्रेस पक्ष वाढवला. मात्र काँग्रेस कार्यकारिणीत कामत समर्थकांनाच डावलून आणि अनेक वर्षे पक्षात कार्यरत राहून काँग्रेसमध्ये बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना या नेमणुकीत झुकते माप देण्यात आल्याचा आरोप या पत्रातून कामत समर्थकांनी व्यक्त केला आहे.
मनसेमधून काँग्रेसमध्ये आलेल्या कलाईव्ह डायस यांना उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी जया पेंगल व महेश मलिक यांची नावे दिवंगत गुरुदास कामत हयात असताना त्यांनी उत्तर पश्चिम जिल्ह्याध्यक्षपदासाठी दिली होती. मात्र त्यांना कामत यांच्या पसंतीची जबाबदारी न देता त्यांच्यात मेरिट नसल्याने त्यांच्या नेमणुका मुंबई कॉंग्रेस कार्यकारिणीवर करण्यात आल्या आहेत. तर निष्ठावान कामत गटाच्या कार्यकर्त्यांच्या नेमणुका ब्लॉक अध्यक्ष म्हणून करण्यात आल्या नसल्याचे आरोप कामत समर्थकांनी आपल्या पत्रातून नमूद केला आहे.