Join us

कामाठीपुरा विकासाचे टेंडर ग्लोबल की लोकल? प्रकल्प सल्लागाराकडूनही सादर होणार आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 10:20 AM

वर्षभरात प्रत्यक्ष बांधकामासाठी ग्लोबल की, लोकल टेंडर काढायचे का? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने वेगाने काम सुरू केले असून, आता प्रकल्प सल्लागाराकडून सादर होणाऱ्या आराखड्यानंतर प्रत्यक्ष बांधकामासाठीची निविदा काढली जाणार आहे. यासाठी तूर्तास प्रकल्प सल्लागाराच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू असून, वर्षभरात प्रत्यक्ष बांधकामासाठी ग्लोबल की, लोकल टेंडर काढायचे का? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सरकारच्या उच्चस्तरीय समितीने कामाठीपुरा पुनर्विकासाच्या व्यवहार्यता अहवालास यापूर्वीच हिरवा कंदील दिला आहे.  आता प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल. २ महिन्यांत सल्लागाराने सविस्तर आराखडा सादर केल्यानंतर राज्य सरकारची मंजुरी घेतली जाईल. त्यानंतरच बांधकामासाठी निविदा काढली जाईल. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर करताना त्या परिसराचा अभ्यास केला जाईल. एकूण किती बांधकामे आहेत.

७३४ जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती :

 जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकर प्राप्त अशा सुमारे ७३४ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ६ हजार ७३ निवासी आणि १ हजार ३४२ अनिवासी गाळे आहेत. या इमारती १०० वर्षांपेक्षा जुन्या असून, त्यामध्ये ३४९ बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. 

 यात १४ धार्मिक वास्तू, दोन शाळा, चार आरक्षित भूखंड आहेत. शिवाय म्हाडाने बांधलेल्या ११ पुनर्रचित इमारती आहेत.

सरकारी, निमसरकारी कार्यालयांसह सर्वच बांधकामांचा म्हणजे क्षेत्रफळाचा अभ्यास केला जाईल. दोन एक महिन्यांच्या कालावधीत ही प्रक्रिया पार पडली की, प्रत्यक्षात बांधकामासाठी टेंडर काढले जाईल. धारावीसारखे ग्लोबल टेंडर काढायचे की लोकल टेंडर काढायचे ? याचा निर्णय प्रकल्पाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर घेतला जाईल, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे देण्यात आली.

टॅग्स :मुंबई