कामाठीपुऱ्याचं बदलणार रूपडं!;  विभाग ‘अर्बन व्हिलेज: कामाठीपुरा टाऊनशिप’ म्हणून ओळखला जाणार

By अतुल कुलकर्णी | Published: December 13, 2021 05:25 AM2021-12-13T05:25:43+5:302021-12-13T05:27:06+5:30

६ टप्प्यांत करण्यात येणार विकास, ५०८ चौरस फुट कार्पेट एरिया देण्यावर भर.

kamathipura mumbai area will be redeveloped The section will be known as Urban Village Kamathipura Township jitendra awhad | कामाठीपुऱ्याचं बदलणार रूपडं!;  विभाग ‘अर्बन व्हिलेज: कामाठीपुरा टाऊनशिप’ म्हणून ओळखला जाणार

छायाचित्र : दत्ता खेडेकर

Next

अतुल कुलकर्णी 
मुंबई : सात बेटांची मुंबई जोडताना मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी म्हणून तेलंगणातून कामाठींना येथे आणले गेले. ते ज्या भागात राहू लागले तो भाग कामाठीपुरा म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे शरीरविक्रय करणाऱ्या महिलांमुळे या विभागाकडे वाईट नजरेने पाहिले जाऊ लागले. मात्र, या संपूर्ण परिसराचे भाग्य आता उजळणार आहे. हा विभाग ‘अर्बन व्हिलेज : कामाठीपुरा टाऊनशिप’ म्हणून ओळखला जाईल. कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

३९ एकराचा हा संपूर्ण परिसर आहे. इंग्रजांच्या काळात ही वसाहत उभी राहिली. मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा अशी मोक्याची ठिकाणे याच्या जवळ आहेत. या भागाचा विकास झाल्यावर तब्बल साडेतीन कोटी स्क्वेअर फूट बांधकाम तयार होईल. त्यामुळे मुंबईच्या घरांच्या किमतीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

येथे राहणाऱ्या कामाठींनी त्याकाळी गॉथिक शैलीच्या बांधकामांसाठी योगदान दिले होते. या भागाचा विकास व्हावा म्हणून येथे राहणाऱ्या महिलांनी सतत मागणी केली होती, असे सांगून गृहनिर्माण मंत्री आव्हाड म्हणाले, १९६१ पासून येथे लोक राहत आले आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या ८ हजार कुटुंबांना नवे घर मिळेल. शिवाय तेवढीच ‘फ्री सेल’चीही घरे उपलब्ध होतील. 

  • प्रत्येक ५० स्क्वे. फुटांमागे ५०८ स्क्वे. फुटांचे घर मिळेल. 
  • ‘वन रूफ, वन कामाठीपुरा, वन मुंबई’ अंतर्गत येथील रहिवाशांना पायाभूत सुविधांनीयुक्त सेवा दिल्या जाणार आहेत. 
  • सध्याच्या मालकांना आणि भाडेकरूंनाही पैसे द्यावे लागणार नाहीत.
     

१०० वर्षे जुन्या इमारती
दक्षिण कामाठीपुरा क्षेत्रामध्ये १५ गल्ल्यांमधील सुमारे ५३० उपकरप्राप्त इमारती आहेत. त्या सुमारे १०० वर्षे जुन्या आहेत.

६ टप्प्यांत विकास

  • ६ टप्प्यांत करण्यात येणार विकास 
  • ५०८ चौरस फुट कार्पेट एरिया देण्यावर भर 
  • १८० इमारती तळमजल्याच्या छतापर्यंत पाडण्यात आल्या आहेत.
  • ५५ इमारती पूर्ण पाडून त्या जागी १५ पुनर्रचित इमारती बांधण्यात आल्या आहेत.


कामाठीपुरा पश्चिम विभाग
११८ इमारती
१२९५ घरे
४१९ दुकाने

कामाठीपुरा पूर्व विभाग
१०३ इमारती
१८५९ घरे
३४२ दुकाने

असे असेल संपूर्ण काम

विक्रीसाठीच्या इमारती आणि पुनर्वसनासाठीच्या इमारती अशी पुनर्विकासाची रचना आहे.

  • मिनी क्रिकेट ग्राऊंड, थीम पार्क, क्लब हाऊस, उद्यान, व्यायामशाळा, जॉगिंग पार्क, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, ॲम्फीथिएटर, कार पार्किंग, दुचाकी पार्किंग, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, उत्तम गुणवत्तेचे सरकते जिने, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सोसायटी ऑफिस, बोअर वेल, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, पोडियम पार्किंग अशी या पुनर्विकास


प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

  • इमारतीचे फ्रेम स्ट्रक्चर आर. सी. सी. असणार आहे.
  • किचन, शौचालय, बेडरूम, हॉल लक्षवेधी असेल.
  • घरांमधील विद्युत यंत्रणा उच्च दर्जाची असण्यासह प्रत्येक विद्युत उपकरणाकरिता वेगळा लाइट पॉइंट असणार आहे.
  • रंगरंगोटीसाठी सिमेंट पेंट व ऑइल बॉँड डिस्टेंपरचा वापर.
  • महापालिकेच्या गरजेनुसार जलक्षमता असणार आहे.
  • इमारतीच्या लिफ्ट स्वयंचलित असणार आहेत.
  • सेफ्टी ग्रिलदेखील पुरविण्यात येणार आहेत.
  • येथील भूखंडाचा जीआयएस सर्व्हे करण्यात आला आहे.
  • अंतिम क्षेत्रफळ म्हाडाकडून प्रमाणांकित करून घेतले जाईल. महापालिकेच्या परवानग्या घेतल्या जात आहेत.

Web Title: kamathipura mumbai area will be redeveloped The section will be known as Urban Village Kamathipura Township jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.