कमला मिल दुर्घटना : निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:34 AM2018-04-03T05:34:15+5:302018-04-03T05:34:15+5:30
कमला मिल आग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचे कामकाज उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चालेल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.
मुंबई - कमला मिल आग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचे कामकाज उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चालेल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.
२९ डिसेंबर रोजी कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ व ‘मोजोस बिस्ट्रो’ला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या महिन्यात दिला होता. सोमवारच्या सुनावणीत सरकारतर्फे ज्येष्ठ वकील विनीत नाईक यांनी ही समिती नेमल्याची माहिती न्या. शंतनू केमकर व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली.
या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.व्ही. सावंत, उच्च न्यायालयाचे वास्तुविशारद वसंत ठाकूर व माजी मुख्य सचिव के. नलीकाक्षन यांचाही या समितीमध्ये समावेश आहे, अशी माहिती नाईक यांनी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने या समितीला ३१ आॅगस्टपर्यंत पहिला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
कमला मिल प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याकरिता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने सरकारला त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा आदेश दिला. कमला मिल व दोन्ही पब्सच्या मालकांनी नियमांचे उल्लंघन केले की नाही, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परवाना देताना
नियमांचे उल्लंघन केले का व अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची शिफारसही ही
समिती करेल.
समितीच्या अध्यक्षांचे मानधन विद्यमान न्यायाधीशांच्या वेतनाएवढेच असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याशिवाय कर्मचारी, कार्यालय व अन्य सुविधा महापालिकाच पुरवेल, असेही न्यायालयाने म्हटले.