कमला मिल दुर्घटना;‘त्या’ पब मालकांचा जामीन नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:57 AM2018-11-02T04:57:23+5:302018-11-02T04:58:04+5:30
कमला मिल कम्पाउंड आगप्रकरणी दोन पब मालकांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.
मुंबई : कमला मिल कम्पाउंड आगप्रकरणी दोन पब मालकांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. गेल्यावर्षी कमला मिल कम्पाउंडमध्ये झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला.
‘मोजोस बिस्ट्रो’चा मालक युग पाठक आणि ‘वन अबव्ह’ पबचा मालक कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी आणि अभिजीत मानकर या चौघांचीही जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जानेवारीमध्ये या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
पोलिसांनी यासंदर्भात फेब्रुवारीत १२ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये पबचे मालक, कमला मिल कम्पाउंडचे मालक आणि मुंबईत महापालिकेच्या अधिकाऱ्यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा आणि लोकांचे आयुष्य धोक्यात घातल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यामध्ये उच्च न्यायालयाने मोजोस बिस्ट्रोचा सहमालक युग तुली याचाही जामीन अर्ज याप्रकरणी फेटाळला. तर मे महिन्यात उच्च न्यायालयाने कमला मिल कम्पाउंडचे मालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांची जामिनावर सुटका केली. त्यांना या दुर्घटनेसाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदविले होते.