#KamalaMillsFire - वॉशरुममध्ये अडकल्याने महिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 09:47 AM2017-12-29T09:47:19+5:302017-12-29T15:42:26+5:30
लोअर परेल येथील कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडवात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला. त्यात महिलांची संख्या जास्त आहे. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे.
मुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडवात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला. त्यात महिलांची संख्या जास्त आहे. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस या चार मजली इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस पबमध्ये सर्वप्रथम आग भडकली. त्यानंतर लगेचच या आगीने रौद्ररुप धारण करत वेगाने ही आग पसरली.
आग भडकल्यानंतर प्रत्येकजण स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटला. एकच गोंधळ सुरु झाल्याने सुरक्षित जागा शोधताना महिला पुरुषांच्या वॉशरुममध्ये घुसल्या. तिथे खेळती हवा नसल्याने नाका, तोंडात धुर जाऊन गुदमरुन मृत्यू झाला. न्यूज 18 वृत्तवाहिनीने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या चार मजली इमारतीत रेस्टॉरंट, पब आणि ऑफीसेस आहेत. जळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले.
माझी बहिण प्रीती राजगारीया (48) तिच्या मुलीसोबत डिनरसाठी तिथे गेली होती. आग लागल्याचे समजताच त्यांनी तिथून बाहेर निघण्याचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. या धावपळीत मुलगी रुची पाय-यांच्या दिशेने धावली तर बहिण प्रीती वॉशरुममध्ये अडकल्याने तिचा गुदमरुन मृत्यू झाला अशी माहिती अजय अग्रवाल यांनी दिली.
गुदरमरल्यामुळे मृत्यू
लोअर परेल येथील कमला मिल कंपाऊंड अग्नि दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू गुदरमरल्यामुळे झाला. केईएम रुग्णालयाचे डॉक्टर राजेश डेरे यांनी ही माहिती दिली. डॉ. डेरे यांनी या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन केले. आगीपासून वाचवण्यासाठी स्वत:ला कोंडून घेतल्याने नाका, तोंडात धुर जाऊन गुदमरून मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली.
मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. या दुर्घटनेत तीन पुरुष आणि 11 महिलांचा मृत्यू झाला. आठ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून चार मृतदेह अजूनही ताब्यात देण्यात आलेले नाहीत. केईएम रुग्णालयातील सर्व जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केईएमचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.