कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवातून 200 जणांना वाचवणारा 'महेश'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 12:58 PM2017-12-29T12:58:29+5:302017-12-29T13:53:56+5:30
दुर्घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्याआधी असे दोन व्यक्ती तिथे उपस्थित होते, ज्यांनी सुमारे 200 जणांचा जीव वाचवला.
मुंबई - दहा दिवसांपूर्वी साकीनाका खैरानी रोडवरील भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगार होरपळले. हादरवून सोडणा-या या घटनेनंतर आज लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत गुदमरून 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात 11 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना केईएम आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आगीमध्ये मृत्यू पावलेल्या निष्पाप लोकांचा मृत्यूचा 200च्या वर गेला असता. पण त्या 200 जणांसाठी देवदूत म्हणून महेश धावून आला. दुर्घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्याआधी असे दोन व्यक्ती तिथे उपस्थित होते, ज्यांनी सुमारे 200 जणांचा जीव वाचवला. महेश साबळे आणि सूरज गिरी अशी त्यांची नावं असून ते कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. आग लागली तेव्हा महेश आणि सूरजने लोकांना तातडीने इमारीतमधून बाहेर काढायला सुरुवात केली, त्यामुळे सुमारे 200 जणांना जीव वाचला.
दुर्घटनेच्यावेळी महेश साबळे त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर होता. आग लागल्यानंतर महेशने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, तिथे असलेल्या लोकांना झटपट खाली पाठवले. त्याच्या या धाडसापणामुळे 200 जणांचा बळी वाचला.
काय म्हणाला महेश -
मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो, त्याचवेळी आगीमुळे लोक धावत माझ्या केबिनमध्ये आले. सुरुवातीला कोणाला बाहेर काढू आणि नको हे समजत नव्हतं. लोक एक्झिट डोअरजवळ उभे होते. नेमकं काय करावं कोणालाच कळत नव्हतं. डोअर आतून लॉक होता. तो दरवाजा मी तोडला आणि 15-200 लोकांना बाहेर काढलं. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाला कॉल करुन बोलावलं. या कामात महेशला सूरज गिरी आणि संतोष नावाच्या दोन साथीदारांनी मदत केली. आगीनंतर महेशने या दोघांना अलर्ट केलं. महेश वरुन ज्या लोकांना खाली पाठवत होता, त्यांना सूरज आणि संतोष सुरक्षित बाहर पोहोचवत होते.
तर दुसरा सुरक्षारक्षक सूरज गिरी म्हणाला की, वर मोठी आग लागली होती. एका गार्डने वरचा दरवाजा तोडला. आमच्या एका गार्डने मला कॉल करुन मी लोकांना खाली पाठवतोय, त्यांना सुरक्षितस्थळी घेऊन जाण्यास सांगितलं. ते जवळपास 200 लोक होते. त्यांना मी सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो. त्यानंतर अग्निशमन दलाला कॉल केला.
दरम्यान, कमला मिल कम्पाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल'ला ही भीषण आग लागली होती. या प्रकरणी मालक अभिजीत मानकर, हितेश संघवी आणि जिगर संघवी याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.