मुंबई, दि. २९ - लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊड मधील भीषण अग्नितांडवात १४ निष्पाप व्यक्तींचा होरपळून मृत्यु झाला. ही दुर्घटना अतिशय गंभीर असून ज्या पब आणि रेस्टॉरंटमधील निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुध्द कारवाई झालीच पाहिजे, परंतु या पब आणि रेस्टॉरंटला नियमांचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द तात्काळ कारवाई झाली पाहिजे.
ज्या पध्दतीने कोपर्डी खटल्याचा निकाल फास्ट ट्रॅक न्यायालयाने देऊन दोषींना शिक्षा सुनावली, त्याचपध्दतीने या घटनेतील दोषींविरुध्द फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तींविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि या दुर्घटनेत जीव गमाविलेल्या निष्पापांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती श्री. विनोद तावडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई झालीच पाहिजे पण नियम डावलून केवळ राजकीय प्रभावाखाली परवानगी देण्यात आली असेल तर त्या राजकीय व्यक्तींचे नाव उघड झाले पाहिजे व त्यांच्याविरुध्दही समान न्यायाने कारवाई झाली पाहिजे, असेही श्री. विनोद तावडे यांनी नमूद केले आहे.