कमला मिल कंपाउंड आग प्रकरण : पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करा, जनहित याचिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 05:34 AM2018-01-02T05:34:27+5:302018-01-02T10:21:00+5:30
तीन दिवसांपूर्वी कमला मिल कंपाउंडमधील वन अबव्ह पब व मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी पबमालक व व्यवस्थापकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला असला तरी या पबना डोळे मिटून परवाना देणा-या...
मुंबई : तीन दिवसांपूर्वी कमला मिल कंपाउंडमधील वन अबव्ह पब व मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी पबमालक व व्यवस्थापकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला असला तरी या पबना डोळे मिटून परवाना देणाºया संबंधित महापालिका अधिकाºयांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाºयांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमधील ट्रेड हाउस येथील वऩ अबव्ह व मोजोस बिस्ट्रो हे पब बेकायदेशीर असून त्यांच्याकडे आग प्रतिबंधक साधने नव्हती. तरीही राजरोसपणे हे पब सुरू होते. महापालिकेच्या जी/ दक्षिण प्रभागातील अधिकारी याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत होते. त्यामुळे पबमालक-चालकांप्रमाणे महापालिका आयुक्त व अधिकाºयांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी विनंती करणारी फौजदारी जनहित याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली
आहे. सध्या उच्च न्यायालयाची नाताळ सुट्टी सुरू असल्याने भालेकर यांनी ही याचिका महानिबंधकांपुढे सादर केली
आहे. कमला मिल परिसरातील या अग्नितांडवात मृत्यू पडलेल्या १४ जणांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये तर जखमी झालेल्या ५५ जणांना १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी विनंतीही भालेकर यांनी याचिकेत केली आहे. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व तोपर्यंत आरोपींची जामिनावर सुटका करू नये, अशीही मागणी भालेकर यांनी न्यायालयाला केली आहे.
व्यवस्थापकांना बेड्या
कमला मिल आगप्रकरणी वन अबव्हच्या दोन व्यवस्थापकांना रविवारी रात्री एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. केवीन बावा आणि लिसबॉन लोपेज अशी अटक व्यवस्थापकांची नावे आहेत. कमला मिलमध्ये लागलेली आग मोजोसमुळे भडकल्याचा दावा व्यवस्थापकांच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कमला मील आगप्रकरणी वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर या तिघांसह व्यवस्थापकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून तिघेही संचालक पसार झाले. त्यांना पसार होण्यास मदत केली म्हणून संघवीच्या तीन काकांविरुद्ध भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात राकेश, आदित्य यांना शनिवारी अटक केली तर महेंद्रला रविवारी केली. तिघांचीही जामिनावर सुटका झाली आहे.
आग मोजोसमुळेच...
सोमवारी केवीन बावा आणि लिसबॉन लोपेज या दोघांनाही भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. अॅड. विजय ठाकूर यांनी व्यवस्थापकांच्या बाजूने युक्तिवाद केला.
ही आग वन अबव्हमुळे नव्हे तर मोजोसमुळे लागल्याचा दावा त्यांनी केला. ती आग मोजोसमधून वन अबव्हकडे आली. तेथे अग्निरोधक यंत्रणांचा अभाव असल्याने त्यांच्या ग्राहकांनी वन अबव्हच्या दिशेने धाव घेतली व त्यात त्यांचा मृत्यू झाला.
हा गुन्हा नसून हा अपघात आहे. शिवाय आमच्या कर्मचाºयांनीच त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आमच्याही एका कर्मचाºयाचा यात मृत्यू झाला. यामध्ये व्यवस्थापकांचा सहभाग नाही. ते फक्त तेथील कर्मचारी आहेत. यामागील मुख्य सूत्रधार मालक आहे. त्यांना पकडण्यात तपास यंत्रणेला यश आलेले नाही. त्यामुळे तपास यंत्रणेने त्यांना पकडणे गरजेचे असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. न्यायालयाने दोघांनाही ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.