मुंबई - कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी मोठी कारवाई करताना 'वन अबब्ह' पबच्या फरार मालकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. लोअर परळ परिसरातील कमला मिल्स अग्नितांडवप्रकरणी 'वन अबव्ह' पबच्या तिस-या मालकालाही बेड्या ठोकल्या आहेत. फरार असलेल्या अभिजीत मानकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. अग्नितांडव घटनेनंतर अभिजीत फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, बुधवारी रात्री उशीरा पोलिसांनी पबचे आणखी दोन मालक कृपेश संघवी आणि जिगर संघवी यांना वांद्रे परिसरातून अटक केली आहे. याआधी या प्रकरणी मोजोसचा मालक युग पाठक याला पोलिसांनी अटक केली होती.
14 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी वन अबव्हचे संचालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि व्यवस्थापक अभिजीत मानकर यांच्यासोबत मोजोसचे मालक युग पाठक, युग तुलीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर याप्रकरणातील आरोपी फरार झाले होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई करून युग पाठक, हॉटेल व्यावसायिक विकास कारिया यांना अटक केली आहे. तसेच पबच्या व्यवस्थांपकांवरही अटकेची कारवाई झाली आहे. तर युग तुली याला हैदराबाद येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, हॉटेल व्यावसायिक विशाल कारियाला मंगळवारी (9 जानेवारी) पोलिसांनी अटक केली होती. 'वन अबव्ह'च्या मालकांना पोलिसांपासून वाचवण्याचा आणि स्वत:च्या घरात आसरा देण्याचा आरोप त्याच्यावर आहे. विशाल करियाकडूनच पसार असलेला आरोपी अभिजीत मानकरची कारही जप्त करण्यात आली होती.
मृतांची नावे :प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली दोषी, पारुल, खुशबू मेहता-बन्सल, मनीषा शहा, प्राची खेतान, यशा ठक्कर, सरबजीत परीदा, धैर्य ललानी, विश्व ललानी