कमला मिल आग दुर्घटना :आणखी तीन अधिकारी दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:01 AM2019-03-01T01:01:01+5:302019-03-01T01:01:11+5:30
कारणे दाखवा नोटीस : १५ दिवसांची मुदत; निष्काळजी पडणार महागात
मुंबई : कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेचा अंतिम चौकशी अहवाल सादर झाला आहे. या अहवालात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले आहे़ बार, हुक्का पार्लर, अनधिकृत बांधकामांकडे या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच आगीची दुर्घटना घडल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील मोजोज् बिस्त्रो आणि वन अबव्ह या रेस्टोपबला २९ डिसेंबर २०१७ रोजी भीषण आग लागली होती. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत १४ ग्राहकांचा नाहक बळी गेला होता. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी समिती स्थापन केली. या समितीने नऊ अधिकारी-कर्मचाºयांवर ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत अनेक परवानग्या खातरजमा न करताच दिल्याचा ठपका ठेवला आहे. जी दक्षिण विभागात काम केलेल्या दोन सहायक आयुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकाºयाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल आयुक्तांना अखेर सादर करण्यात आला आहे.
या चौकशीत तीन अधिकाºयांनी आपल्या कामात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार आयुक्तांना संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. १५ दिवसांमध्ये या अधिकाºयांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.
सर्व १२ अधिकाºयांना एकत्रित शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या दुर्घटनेला जबाबदार ठरलेल्या ५ अधिकाºयांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. तसेच १० अधिकाºयांची खात्यांतर्गत चौकशी सुरू होती. इमारत प्रस्ताव खाते, ‘जी/दक्षिण’ विभाग कार्यालय आणि मुंबई अग्निशमन दल यातील अधिकाºयांचा यात समावेश आहे.
या तीन अधिकाऱ्यांवर ठपका
प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त, के-पूर्व, तत्कालीन सहायक आयुक्त ‘जी/दक्षिण’ विभाग
भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त एन विभाग, तत्कालीन सहायक आयुक्त ‘जी/दक्षिण’ विभाग
डॉ. सतीश बडगीरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ‘जी/दक्षिण’ विभाग (निलंबित)
हे पाच अधिकारी होते निलंबित
या प्रकरणात पाच अधिकाºयांना तत्काळ निलंबित करण्यात आले होते. यामध्ये (बेकायदा बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी) नियुक्त अधिकारी मधुकर शेलार, इमारत व कारखाने विभागाचे दुय्यम अधिकारी दिनेश महाले आणि कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे ( नोटीस दिली, मात्र कारवाई नाही). वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे (नोटीस दिली पण कारवाई नाही), विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे (अग्निरोधक यंत्रणेत कमतरता असताना वन अबव्ह पबला ना हरकत प्रमाणपत्र दिले.)
या अधिकाऱ्यांची चौकशी : सहायक अभियंता मधुकर शेलार आणि मनोहर कुलकर्णी, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. राजेश मदान, अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र पाटील, स्वच्छता निरीक्षक प्रदीप शिर्के.