कमला मिल अग्नितांडव : मोजोस बिस्ट्रो पबचा भागीदार युग पाठकला सहा दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 04:12 AM2018-01-08T04:12:38+5:302018-01-08T20:35:21+5:30
कमला मिल कम्पाउंडमधील भीषण अग्नितांडव प्रकरणी अटक केलेल्या मोजोस बिस्ट्रो पबचा भागीदार युग पाठक याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
मुंबई : कमला मिल कम्पाउंडमधील भीषण अग्नितांडव प्रकरणी अटक केलेल्या मोजोस बिस्ट्रो पबचा भागीदार युग पाठक याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र, त्याचा भागीदार व उद्योगपती युक तुली आणि वन अबव्हचे संचालक कृपेश सिंघवी, जिगर संघवी, अभिजित मानकर, तसेच कमला मिलचा मालक रमेश गोवानी अद्याप फरारच आहेत. १० दिवस उलटूनही त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
युग हा पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आहे, तर तुली हा राजकीय वरदहस्त असलेल्या बड्या उद्योगपतीचा मुलगा आहे. ११ महिलांसह १४ निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या कमला मिलच्या आगीला पहिल्यांदा मोजोस बिस्ट्रोमध्ये हुक्का पार्लरमधून सुरुवात झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्याबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या अहवालानुसार, ‘मोजोस’च्या मालकांविरुद्ध ‘वन अबव्ह’प्रमाणे सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, शनिवारी सायंकाळी युग पाठकला पबच्या व्यवस्थापकासह अटक करण्यात आली होती.
रविवारी त्याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी आगीच्या सुरक्षा यंत्रणाचा अभाव, त्याबाबत दाखविण्यात आलेल्या निष्काळजीपणाबाबत माहिती व या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठककडे तपास करणे आवश्यक असल्याने, १५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली, तर बचाव पक्षाच्या वकिलाने युग पाठक हा घटनेच्या वेळी त्या ठिकाणी हजर नव्हता, त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी नसल्याचा मुद्दा मांडला. अखेर न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली.