कमला मिलचा मालक रमेश गोवानीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 04:14 AM2018-01-23T04:14:44+5:302018-01-23T04:15:02+5:30
कमला मिल दुर्घटनेप्रकरणी दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत सोमवारी रात्री कमला मिलचा मालक रमेश गोवानीला बेड्या ठोकण्यात आल्या. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुंबई : कमला मिल दुर्घटनेप्रकरणी दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत सोमवारी रात्री कमला मिलचा मालक रमेश गोवानीला बेड्या ठोकण्यात आल्या. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कमला मिलमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्टोमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एन.एम. जोशी मार्ग
पोलिसांनी वन अबव्हचा संचालक क्रिपेश संघवी, जीगर संघवी, अभिजित मानकर यांच्यासह व्यवस्थापकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अग्निशमन दलाच्या अहवालानंतर मोजोसच्या युग पाठक आणि युग तुलीलाही या गुन्ह्यांत आरोपी करत बेड्या ठोकल्या. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दुर्लक्ष केल्याचा ठपका-
सोमवारी रात्री कमला मिलचा मालक रमेश गोवानी याला या गुन्ह्यांत अटक करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांनी दिली.
वन अबव्ह आणि मोजोसमधील अनधिकृत बांधकाम तसेच अपुºया सुरक्षा व्यवस्थेबाबत गोवानीलाही माहिती होती. तरीही त्याकडे त्याने दुर्लक्ष केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. एमआरटीपी अंतर्गत दाखल दोन गुन्ह्यांमध्येही गोवानी आरोपी आहे. या प्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी दिली.
शनिवारी कमला मिलचा भागीदार रवी भंडारी, अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील आणि वन अबव्हला हुक्कापुरवठा करणारा उत्कर्ष विनोद पांडेला अटक करण्यात आली. त्यांच्याच चौकशीत गोवानीचे नाव पुढे आले.