मुंबई - कमला मिल अग्नितांडव दुर्घटनेवर आज विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. याविषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षांना लक्ष्य केले. कमला मिल हे मागच्या सरकारचं पाप असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. कमला मिलमध्ये अधिक एफएसआय का दिला याची चौकशी करणार. मिल मालकाच्या घशात जागा घालण्याचा हा भ्रष्टाचार आहे असा आरोप फडणवीस यांनी केला.
28 डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिल कंम्पाऊंडमधील वन अबाव्ह आणि मोजोस बिस्त्रो या पब आणि हॉटेलला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीपासून वाचवण्यासाठी स्वत:ला कोंडून घेतल्याने नाका, तोंडात धुर जाऊन गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त होती. या दुर्घटनेत तीन पुरुष आणि 11 महिलांचा मृत्यू झाला.
पालिकेने सुरु केला होता कारवाईचा धडाका
कमला मिल दुर्घटनेनंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली व २४ तासांमध्ये मुंबईतील तब्बल ३१४ उपहारगृह, मॉल्स, हॉटेलचे बेकायदा बांधकाम पाडण्यात आले. तसेच सात उपहारगृहांना टाळे लावण्यात आले.
गिरण गावात असे अनेक पब व गच्चीवरील रेस्टॉरंटमध्ये सर्रास बेकायदा बांधकाम सुरु होती. या बांधकामांकडे आतापर्यंत पालिका अधिकारी डोळेझाक करीत होते. मात्र या दुर्घटनेनंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सर्वच मैदानात उतरल्याचे दिसून आले. मुंबईच्या कानाकोपऱ्यातील तब्ब्ल ६२४ ठिकाणी तापसणी केल्यानंतर तब्ब्ल ३१४ ठिकाणी अनियमितता आढळून आली. यामध्ये जिमखाने, गच्चीवरील रेस्टॉरंट, पब, उपहारगृहांचा समावेश होता.