कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : 'तिचं' मुंबई फिरण्याचं स्वप्न राहिलं अधुरं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 12:08 PM2017-12-29T12:08:54+5:302017-12-29T12:09:21+5:30
दुर्घटनेमध्ये यशा ठक्कर नावाच्या 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झालाय.
मुंबई- लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जखमी झाले आहेत. गुरुवारी ( 28 डिसेंबर ) इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस बिस्ट्रो पबमध्ये भीषण असं अग्नितांडव घडलं. मोजोस बिस्ट्रो पबमधील या घटनेत कोणाचा वाढदिवस अखेरचा ठरला तर कोणाचा स्वप्न अपूर्ण राहिलं. या दुर्घटनेमध्ये यशा ठक्कर नावाच्या 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झालाय.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यशा गुजरातहून मुंबईला आली होती. थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी तिची तयारी होती. ती पहिल्यांदाच नव्या वर्षाचं स्वागत मुंबईत करणार होती. त्यामुळे ती फारच उत्साहात होती. मुंबई फिरण्याचं यशाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. यशा गुरुवारी (28 डिसेंबर) रात्री चुलत भाऊ आणि बहिणीसोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये जेवायला गेली होती. पण त्यानंतर तिथे आग लागली आणि पाहता पाहता आग हॉटेलमध्ये पसरली. आग लागल्यानंतर चुलत बहिणी जीव वाचवण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्याने ती बचावली. पण यशा आगीच्या कचाट्यात सापडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशाचे आई-वडील गुजरातहून मुंबईत दाखल झाले आहेत.
मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
हॉटेल वन अबाव्ह चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व एलएलपी कंपनीचे मालक आहेत. ONE ABOVE आणि मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची माहिती मिळत आहे.