मुंबई - कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला अटक करण्यात आली आहे. मोजोचे मालक युग पाठक आणि युग तुली यांच्यासोबतच एका मॅनेजरविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ना. म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 जणांचा गुदमरुन मृत्यू
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ११ तरुणींसह १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री (28 डिसेंबर 2017 ची घटना) ही दुर्घटना घडली. इमारतीतील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये २४ महिलांसह ५४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पबमालक अभिजित मानकर, रितेश संघवी, जिगर संघवी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतले आहे. तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाच अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
मृतांची नावे :प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली दोषी, पारुल, खुशबू मेहता-बन्सल, मनीषा शहा, प्राची खेतान, यशा ठक्कर, सरबजीत परीदा, धैर्य ललानी, विश्व ललानी
कुठल्याही दबावाशिवाय अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा - उद्धव ठाकरे
‘कोणत्याही बड्या नेत्याचा दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करावी.’ असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांना दिला आहे. शनिवारी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी कारवाई थांबविण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा गौप्यस्फोट मनपा आयुक्तांनी केला होता. आगीच्या दुर्घटनेनंतर कमला मिलमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली. मात्र ही कारवाई करताना एका राजकीय नेत्याने आपल्यावर दबाव आणल्याचे आयुक्तांनी सभागृहात सांगितले.
मात्र मी ऐकणार सगळ्यांचे पण काम करणार कायद्याप्रमाणेच हेच माझे तत्त्व आहे. म्हणूनच तिथे 17 बेकायदा बांधकामं मी पाडली आणि ही कारवाई अशीच सुरू राहणार, मी मागे हटणार नाही, असे सांगितले. मात्र त्या नेत्याचे नाव जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आयुक्तांनी कोणाचाही दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. शिवसेना त्यांच्या सोबत असेल. फक्त बांधकाम अधिकृत आहे का अनधिकृत याची खातरजमा करावी.'
दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपाला टोलादेखील हाणला. ‘कमला मिल प्रकरणात पब चालकांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करावं लागतं हा म्हणजे कहरच झाला. इनाम लावायला ते दहशतवादी आहेत का?, जर पबचे मालक अद्याप सापडत नसतील तर पोलीस खातं नेमकं काय करतंय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.