Join us

कामोठेकर झिजवताहेत शाळांचे उंबरठे

By admin | Published: February 02, 2015 2:50 AM

कामोठ्यात तुलनेत दर्जेदार शैक्षणिक संकुल नसल्याने पालकांना इतर वसाहतीतील शाळांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मात्र तेथेही स्थानिक रहिवासी

रवींद्र गायकवाड,  कामोठेकामोठ्यात तुलनेत दर्जेदार शैक्षणिक संकुल नसल्याने पालकांना इतर वसाहतीतील शाळांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मात्र तेथेही स्थानिक रहिवासी नसल्याचे कारण पुढे करून प्रवेश नाकारला जात असल्याने कामोठेकरांसमोर मुलांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आमच्या मुलांनी जायचे कुठे, असा सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करीत आहेत. कामोठे वसाहतीलगत खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानक असल्याने येथून काही मिनिटांत उपनगरीय रेल्वे गाड्या पकडता येतात. याव्यतिरिक्त पनवेल-सायन महामार्ग बाजूने जातो. परिणामी, या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा चांगल्या असल्याने अनेक चाकरमानी, व्यावसायिक त्याचबरोबर मोठमोठ्या कंपन्यांतील उच्चपदस्थ या नोडमध्ये राहतात. एकूण ४५ सेक्टरमध्ये विस्तारलेल्या या वसाहतीतील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती या नोडची आहे. या ठिकाणी उद्यान, मैदान, सार्वजनिक शौचालय, पाणीपुरवठा या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. येथील शिक्षण संस्था खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील शैक्षणिक संकुलांशी स्पर्धा करण्यास मागे पडतात. या वसाहतीत फक्त एमएनआर ही हायटेक एज्युकेशन देणारी संस्था असून, या ठिकाणी मर्यादित जागा असल्याने सर्वांनाच प्रवेश मिळत नाही. त्यामुळे कामोठे येथील पालक खारघर येथील विश्वज्योत, ग्रीन फिंगर्स, रेयॉन, जॅक अ‍ॅन्ड जील, डीएव्ही, सेंट जोसेफ, सरस्वती इंग्लिश स्कूल आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या ठिकाणी प्रवेश अर्ज भरतात. त्याचबरोबर कळंबोलीमधील कारमेल, सेंट जोसेफ व नवीन पनवेलच्या डीएव्ही, न्यू होराझन, सेंट जोसेफ, रेयॉन, शांतिनिकेतन, महात्मा एज्युकेशन सोसायटी या शाळेचे पालक उंबरठे झिजवतात. वास्तविक पाहता या सर्व शाळा नामांकित असून ठराविक जागांकरिता हजारो अर्ज शाळांकडे येतात. प्रत्येक शाळेची प्रवेश प्रक्रि या वेगवेगळी असते. कारमेल स्कूलमध्ये विद्यार्थिनींना जास्त प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर डीएव्ही स्कूलमध्ये ज्यांची मुले या ठिकाणी पूर्वीपासून शिकतात, त्यांच्या दुसऱ्या अपत्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर काही शाळा शिफारशीनुसार प्रवेश देत असल्या तरी जवळपास सर्व शैक्षणिक संकुलांत त्याच वसाहतीत राहणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. परिणामी कामोठे वसाहतीतील रहिवासी असलेल्यांच्या मुलांना आर्थिक क्षमता असतानाही प्रवेश मिळत नाही.