एसी बंद असल्याने प्रवासी संतप्त; कामायनी एक्सप्रेस तासभर रोखली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 07:44 PM2019-05-13T19:44:51+5:302019-05-13T19:45:41+5:30
कामायनी एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस वरून निघाल्यानंतर गाडीच्या वातानुकूलित डब्यातील ए सी यंत्रणा बंद असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.
मनमाड (नाशिक)-: गाडी क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यामधील एसी यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. गाडी निघाल्यापासून तक्रार करूनही दखल घेण्यात न आल्याने अखेर संतप्त प्रवाशांनी मनमाड रेल्वे स्थानकावर कामायनी एक्सप्रेस एक तास रोखून धरली. वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त झाल्यानंतर गाडी भुसावळकडे रवाना झाली.
कामायनी एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस वरून निघाल्यानंतर गाडीच्या वातानुकूलित डब्यातील ए सी यंत्रणा बंद असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. ही यंत्रणा कल्याण रेल्वे स्थानकावर दुरुस्त करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गाडी कल्याण रेल्वे स्थानकावर आल्यानंतर ही दुरुस्ती करण्यात न आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. उन्हाच्या झळा वाढल्या असून वाढत्या तापमानामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत गाडीची वातानुकूलित यंत्रणा बंद झाल्याने प्रवाशी घामाघूम झाले. वाढत्या उष्णतेमुळे गाडीतील महिला व लहान मुलांना खूप त्रास सहन करावा लागला. ही गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकात आल्यानंतरही दुरुस्ती करण्यात न आल्याने रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारा बाबद प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त प्रवाशानी मनमाड रेल्वे स्थानकात गाडी रोखून धरली. जो पर्यंत वातानुकूलित यंत्रणा सुरू होत नाही तो पर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा संतप्त प्रवाशांनी घेतल्याने रेल्वे प्रशासनाची धांदल उडाली. अखेर रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्यावतीने गाडीची वातानुकूलित यंत्रणा युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर गाडी भुसावळ कडे रवाना झाली. रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे गाडीला तब्बल एक तास रोखून धरण्यात आल्याने अन्य प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.