Join us

कंडका पाडायचा... मुंबईच्या वानखेडेवरही गाजतेय कोल्हापूरची राजाराम कारखाना निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 9:15 AM

मुंबई इंडियन्सचा फॅन सिद्धेश मोरेना स्टेडियममध्ये झळकवलं पोस्टर

Mumbai Indians, Kolhapur Elections: मुंबई/कोल्हापूर: राजाराम कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या "आमचं ठरलंय, कंडका पाडायचा, उसाला दर मिळवायचा" या टॅगलाईनने प्रचारात रंगत आणली. राजारामच कार्यक्षेत्र असलेल्या 122 गावाबरोबरच , संपूर्ण जिल्हा आणि राज्यात या टॅग लाईनचा बोलबाला झाला. याही पुढे जाऊन सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट टुर्नामेंटवेळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यादरम्यान "कंडका पाडायचा" हा बोर्ड झळकला. मुंबई इंडियन्सचा फॅन असलेल्या सिद्धेश मोरे या वडणगेच्या युवकाने हा बोर्ड झळकावून सर्वांचे लक्ष वेधले.

कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज, रविवारी मतदान होत आहे. मागील पंधरा-वीस दिवस आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. माजी आमदार महादेराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणास लागल्याने पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. ‘राजाराम’ कारखान्याचा संघर्ष निवडणुकीपुरता राहिला नाही; तर गेली पाच वर्षे सभासदांवरून महाडिक व पाटील यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू राहिली. शह काटशहाचे राजकारण करत एकमेकांना रोखण्याची एकही संधी महाडीक व पाटील यांनी सोडली नाही. सभासद अपात्र, त्याला दिलेले आव्हान पुन्हा पात्र ठरले. सभासदांचा विषय संपल्यानंतर उमेदवार पात्र, अपात्रतेचा मुद्दा चांगलाच गाजला.

कारखान्याच्या पोटनियमाचा काटेकोरपणे वापर करत विरोधी आघाडीतील दिग्गजांना निवडणूक रिंगणाबाहेर थांबवण्यात यश मिळवले. या सगळ्या घडामाेडींचे पडसाद प्रचारसभांमध्ये उमटले. आव्हान, प्रतिआव्हान आणि त्यातून निर्माण झालेली इर्षा या सगळ्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी मतदान होत आहे. हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांतील ५८ मतदान केंद्रांवर उद्या, सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होत आहे. त्यासाठी ५८० कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. साधारणता एका केंद्रावर दहा कर्मचारी नियुक्त केले आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सकोल्हापूरनिवडणूक