भांडुप येथील कांदळवन क्षेत्र पक्षी निरीक्षणासाठी विकसित होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 05:55 PM2020-10-29T17:55:03+5:302020-10-29T17:55:31+5:30
Bird Watching : कांदळवन प्रतिष्ठानच्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : कांदळवन संरक्षणासाठी ११७ सुरक्षारक्षक आहेत. त्यात वाढ करून १८३ करण्याचा तसेच भांडुप येथील कांदळवन क्षेत्र पक्षी निरीक्षणासाठी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता इंटरप्रिटेशन सेंटर व स्वागत कमान उभारण्याचे ठरविण्यात आले. कांदळवन प्रतिष्ठानच्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कांदळवन लागवडीचा आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त कांदळवन लागवड वाढवावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. उभादांडा, वेंगुर्ला येथे २१ कोटी रुपयांचे खेकडा, जिताडा, शिंपले बीज निर्माण केंद्र तयार करण्यास तत्वतः मान्यता प्रदान करण्यात आली. मत्स्य विकास विभाग व वन विभाग हा प्रकल्प संयुक्तपणे राबविणार आहे. राज्यातील कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन ही वन विभागाच्या कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानची मुख्य जबाबदारी आहे. बैठकीत मागील आर्थिक वर्षातील खर्च १७.२७ कोटी रुपये तसेच या वर्षाच्या २१ कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.
ऐरोली येथे किनारी व सागरी जीवांचे जायंट ऑफ द सी संग्रहालय बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास १० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना सागरी क्षेत्राची आवड आणि माहिती व्हावी याकरिता सागरी बाल वैज्ञानिक परिषद आयोजित करण्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे.