डबेवाल्यांचा ‘कानडी’ रोष
By admin | Published: July 29, 2014 12:53 AM2014-07-29T00:53:17+5:302014-07-29T00:53:17+5:30
सीमा प्रांतामध्ये कर्नाटक पोलिसांनी मराठी बांधवांवर अन्याय व अत्याचार चालविला आहे. त्यांना अमानुषपणे मारहाणही केली जात आहे.
मुंबई : सीमा प्रांतामध्ये कर्नाटक पोलिसांनी मराठी बांधवांवर अन्याय व अत्याचार चालविला आहे. त्यांना अमानुषपणे मारहाणही केली जात आहे. याच घटनेचा निषेध नोंदवित मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या वतीने डबेवाल्यांनी काळी फीत लावून आपला ‘कानडी’ रोष व्यक्त केला.
डबेवाल्यांनी सोमवारी लोअर परळ येथील पुलावर काम करताना काळी फीत लावून कर्नाटक पोलिसांचा निषेध व्यक्त केला. तसेच निषेध फलकाच्या माध्यमातून आतातरी सरकारने कृतिशील आराखडे रचावेत, असा संदेश देण्यात आला.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने या घटनेची तातडीने दखल घ्यावी आणि मराठी माणसांवरील अन्याय रोखण्यासाठी पाऊल उचलावे, असे निवेदनही मंडळातर्फे गृहमंत्री आर.आर. पाटील यांना देण्यात येणार असल्याचे मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.भारतासह जगात कुठेही मराठी माणसांवर अन्याय व अत्याचार होत असेल तर त्याच्यामागे मुंबईचा डबेवाला एक मराठी बंधू म्हणून या लढ्यात सोबत राहील, असेही या वेळी तळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)