Join us

कांदिवलीत १७ दिवसांत ५८ रुग्ण झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 6:41 PM

कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील पावनधाम येथे कोरोना केअर सेंटर सुरू झाले.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत असतांना,उत्तर मुंबईच्या नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील पावनधाम येथे 70 बेडचे कोरोना केअर सेंटर 30 मे रोजी सुरू झाले. गेल्या 17 दिवसात या सुसज सेंटर मध्ये 123 कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर त्यापैकी 58 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले. 24 तास हे सेंटर सुरू असून 70 वॉर्ड बॉय,नर्सेस, तसेच डॉक्टर्स कार्यरत आहे.

उत्तर मुंबई भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी याठिकाणी सुसज्ज कोरोना सेंटर सुरू होण्यासाठी प्रयत्न केले होते. पोयसर जिमखान्याने सुमारे 65 ते 70 लाख रुपयांची मशिनरी येथे उपलब्ध करून दिली होती. घाटकोपरचे आमदार पराग शाह, पावनधामचे विश्वस्त दिनेश मोदी,नीरव दोशी यांनी या कोरोना सेंटरला मोलाचे सहकार्य केले आहे. तर पावन धामने आपली जागा उपलब्ध करून दिली.

एकीकडे कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याचा अनेक तक्रारी असतांना,येथे खरे तर एका रुग्णांमागे रोज 8 ते 9 हजार रुपये खर्च येत आहे. मात्र येथे कमी दरात कोरोना रुग्णांवर उपचार करा असे आवाहन नम्रमुनी महाराजांनी व भाजपाच्या नेत्यांनी  केले होते. त्यामुळे उर्वरित भार पोयसर जिमखाना, पावनधाम व आमदार पराग शाह यांनी उचलण्याचे ठरवले. त्यामुळे रोज केवळ 1000 रुपयांच्या नाममात्र दरात येथे कोरोना रुग्णांवर उपचार होतात अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.

धर्मादाय संस्था कमी दरात कोरोना रुग्णांना चांगले उपचार देतात याचे पावनधाम हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे व शासनाने,पालिकेने जर आरोग्य सेवा देण्यासाठी पुढे येणाऱ्या धर्मादाय संस्थाना कोरोना सेंटर उघण्यास परवानगी दिल्यास भविष्यात गरजू नागरिकांना कमी दरात उपचार मिळतील असा विश्वास खासदार शेट्टी यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस