कांदिवलीत ८ बांगलादेशींना बेड्या, एटीएसची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:50 AM2018-03-24T04:50:19+5:302018-03-24T04:50:19+5:30
बांगलादेशने बंदी घातलेल्या अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना भविष्यात महाराष्ट्रासह भारतासाठी धोका ठरू शकते, या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांनी बांगलादेशींची धरपकड सुरू केली आहे. पुणे, महाड, अंबरनाथ, पनवेल येथील कारवाईनंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज कांदिवली येथून ८ बांगलादेशींसह एकूण ९ जणांना अटक केली आहे.
मुंबई : बांगलादेशने बंदी घातलेल्या अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना भविष्यात महाराष्ट्रासह भारतासाठी धोका ठरू शकते, या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांनी बांगलादेशींची धरपकड सुरू केली आहे. पुणे, महाड, अंबरनाथ, पनवेल येथील कारवाईनंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज कांदिवली येथून ८ बांगलादेशींसह एकूण ९ जणांना अटक केली आहे. हे आठही जण १८ ते २२ वयोगटातील आहे.
दहा वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये एबीटीच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याचे उघडकीस आले. या संघटनेचा अल कायदाशी संबंध स्पष्ट होताच बांगलादेश सरकारने दोन वर्षांपूर्वी या संघटनेवर बंदी घातली. बंदीनंतर संघटनेच्या अतिरेक्यांनी रोजगाराच्या निमित्ताने मुंबई, महाराष्ट्रासह भारतात विविध ठिकाणी आश्रय घेतल्याचा संशय एटीएसला आहे.
एटीएसने पुणे, महाड आणि अंबरनाथ येथून अटक केलेले पाच बांगलादेशी हे एबीटीचे सदस्य आहेत. त्यांनी मधल्या काळात एबीटीच्या अतिरेक्यांना आश्रय दिल्याचे स्पष्ट झाले होते. यातील मुख्य आरोपी राजू मंडल (३१) हा पुण्यात इमारत बांधकामात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता, तर अन्य दोन आरोपी बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. त्यामुळे एनआयए, केंद्रीय गुप्तचर
यंत्रणा आणि राज्यांमधील दहशतवादविरोधी पोलीस पथकांनी एकत्रितरीत्या एबीटीविरोधात मोहीम सुरू केली आहे.