मुंबई : सांताक्रुझ, बोरीवली, कांदिवली, मुलुंड, नेरुळ आणि पनवेल येथील किमान तापमान २० अंश सेल्सिअसखाली घरसले असून, राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ८.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. किमान तापमानाचा पारा अधिकाधिक घसरत असून, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत थंडीचा प्रभाव सर्वाधिक आहे. येथील किमान तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशाखाली नोंदविण्यात आले असून, बुधवारसह गुरुवारी हवामानाची ही स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातदेखील बऱ्यापैकी थंडीचा प्रभाव जाणवत असला, तरी दिवसाच्या तापमानात घसरण झालेली नाही. कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, रात्रीचे किमान तापमान मात्र २० अंशाखाली येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, उत्तरोत्तर यात आणखी घसरण होईल आणि थंडीचा प्रभाव आणखी जाणवेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्याचा विचार केल्यास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक थंडी जाणवत असून, उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे वाहू लागल्यानंतर यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर भारतातही थंडीचा प्रभाव अधिक असून, दिल्लीचे किमान तापमान १० अंशाखाली घसरले आहे.
राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
सांताक्रुझ १९.२, कुलाबा २२.५, पुणे ११.३, बारामती ११.९, औरंगाबाद १२.५, महाबळेश्वर १३.६, नाशिक ११.८, डहाणू १९.८, जळगाव १२, कोल्हापूर १६, सातारा १२.८, सोलापूर १३, चंद्रपूर ८.६, परभणी १०.१, यवतमाळ ९.५, गोंदिया १०.५, नागपूर ११.५.