Join us

दगड खाणींसाठी प्रसिद्ध कांदिवली

By admin | Published: May 26, 2014 4:03 AM

मुंबई शहरातील सर्वांत ‘पॉश’ आधुनिक निवासी कॉम्प्लेक्ससाठी ओळखण्यात येणारी कांदिवली मुंबईच्या इतिहासात प्रस्तर युगातली आहे.

सुशांत मोरे, मुंबई शहरातील सर्वांत ‘पॉश’ आधुनिक निवासी कॉम्प्लेक्ससाठी ओळखण्यात येणारी कांदिवली मुंबईच्या इतिहासात प्रस्तर युगातली आहे. या ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामातून मिळालेल्या कलाकृतींतून ते सिद्ध झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येथील व्यापार्‍यांचे संबंध यूनान आणि मेसोपोटेमियापर्यंत होते. कांदिवली मुख्यत: दगडांच्या खाणीसाठीही प्रसिद्ध होती. मात्र या कांदिवलीचा आता बराच कायापालट झाला आहे. ८0च्या दशकात रियल इस्टेटच्या किमतीत वाढ होईपर्यंत हा भाग संपूर्ण शेती, गाव आणि झोपडपट्टीवासीयांनी भरलेली वस्ती असा होता; ज्यामध्ये चारकोपच्या कोळी लोकांची संख्या जास्त होती. कांदिवलीचा विकास साधारणपणे याच दशकापासून सुरू झाला आणि ९0च्या दशकात अनेक रहिवासी संकुलांची यात भर पडली. आता ३२ किलोमीटर लांबीच्या चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रोमुळे या क्षेत्राचा विकास झपाट्याने होणार आहे. कांदिवली फार पूर्वी दगडांच्या खाणींसाठी प्रसिद्ध होती. १८६0च्या दशकात येथील खाणींतूनच माती आणि दगड घेऊन ट्रेन रोज अप-डाऊन करीत होत्या. कांदिवलीचे नामकरण हे ‘कंदील’ अन्यथा ‘खांड’ यामुळे पडल्याचे सांगितले जाते. साधारण तीन वर्षांच्या मागणीनंतर कांदिवली स्टेशन सुरू झाले होते, ते १९0७ या वर्षात. त्या वेळी हे स्थानक बनवण्यास ५७ हजार २११ रुपये खर्च आला. १९२५मध्ये स्टेशनला सोयीसुविधांनी सज्ज करण्यात आले. आज सर्वांत जलदगतीने विकसित होणार्‍या कांदिवलीत एकेकाळी घनदाट जंगल होते. आता शानदार मॉल, मल्टिप्लेक्स आणि फ्लायओव्हरने भरलेली कांदिवली पूर्वी गुजराती आणि मारवाड्यांनी व्यापलेली होते. ज्यामध्ये अन्न, कपडा व्यापारी आणि शेअर दलालांचा मोठा गट होता. चांगल्या आणि ताज्या हवेमुळे ६0 ते ७0 वर्षांपूर्वी येथे टी.बी. रुग्णांसाठी २0 सेनेटोरियम होते. सध्या उत्तर भारतीय आणि नोकरदार वर्गाचा या ठिकाणी दबदबा आहे.