लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवली फ्लायओव्हरवर एका धावत्या कारच्या समोर मेटलशीट मंगळवारी संध्याकाळी कोसळली. या घटनेस कारणीभूत ठेकेदाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध समतानगर पोलीस घेत आहेत.
मेटलशीट ज्या वाहनासमोर कोसळली त्याच्या चालकाने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ठेकेदाराचा निष्काळजीपणा यात उघड झाला आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 'सदर घटनेस जबाबदार असलेला ठेकेदार कोण आहे याचा शोध आम्ही घेत आहोत. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल' अशी माहिती समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी दिली. एमएमआरडीएने देखील प्रकल्प संचालकाना दुर्घटनेबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यात तथ्य आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला दंड आकारत कारवाई करण्यात येणार आहे.