मुंबई: समतानगर परिसरात प्री स्कूलमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर शाळेच्या सुरक्षारक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती लपवल्याचा दोन शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेवर आरोप आहे. हे तिघेही सध्या पसार असून, पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे.
शनिवारी समतानगर पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील ५५ वर्षीय आरोपीला अटक केली. हा प्रकार माहीत असूनदेखील त्याबाबत पोलिसांना न कळवणाऱ्या, तसेच माहिती लपविणाऱ्या शाळेची मुख्याध्यापिका व दोन शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार झालेल्या शाळेत १०० मुले शिकत होती. त्यामुळे गेले तीन दिवस शाळा बंद असून, याठिकाणी पोलिसांची एक मोबाइल व्हॅन बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आली आहे.
अत्याचार झाल्यावर शिक्षकांनी या घटनेचे पुरावे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजदेखील शाळा प्रशासनाने डिलिट केले असा आरोप पीडितेच्या वडिलांनी काही व्हिडीओंमार्फत केला आहे.
त्या अनुषंगाने समतानगर पोलिसांनी सदर डीव्हीआर ताब्यात घेतला जो न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पडताळणीसाठी पाठवण्यात येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, शाळेचे शटर डाउन असल्याने तेथे शिकणाऱ्या मुलांच्या पालकांकडून शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.