Join us

‘त्या’ पाच कुत्र्यांची हत्या सायको किलरकडून?; कांदिवलीमधील नाल्यात आढळले मृतदेह!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 9:28 AM

या हत्येमागे कुत्र्यांचा द्वेष करणाऱ्या एखाद्या सायको किलरचा हात असावा, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : कांदिवली येथील एका सोसायटीने अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाच कुत्र्यांना निर्घृणपणे मारल्याचा आरोप केला असून, त्यांचे मृतदेह बांधून कांदिवली नाल्यात फेकल्याची तक्रार पोलिसांत  दाखल केली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एफआयआर नोंदविला. पोलिसांनी नाल्यातून त्या मृत कुत्र्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या हत्येमागे कुत्र्यांचा द्वेष करणाऱ्या एखाद्या सायको किलरचा हात असावा, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

साईनगर येथील मंगलमय टॉवरच्या शेजारी एक नाला आहे, जिथे पाच कुत्र्यांचे मृतदेह सापडले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून सुमारे १३-१४ कुत्री बेपत्ता असल्याचा आरोप सोसायटी सदस्यांनी केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पाच कुत्र्यांचे मृतदेह नाल्यात तरंगत असल्याचे सोसायटीच्या सदस्यांच्या लक्षात आले. आशिष हसमुख बुसा असे तक्रारदाराचे नाव आहे. ९ नोव्हेंबर रोजी एका महिलेला नाल्यात कुत्र्यांचे मृतदेह तरंगताना आढळले. त्यांचे पाय दोरीने बांधले होते. 

सोसायटीच्या सदस्यांनी याची माहिती पाल एनजीओचे सदस्य रोशन पाठक यांना दिली. ते त्यांच्या टीमचे रोहित कुमार, राकेश मुक्का, अनुराधा भंडारी आणि दीपाली जैन यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कांदिवली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालिकेच्या मदतीने त्यांनी कुत्र्यांचे मृतदेह नाल्यातून बाहेर काढले. कुत्र्यांचे पाय बांधून नंतर त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.

सीसीटीव्ही तपासणीची विनंती रोशन पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कुत्र्यांचे पाय दोरीने बांधून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या हत्येमागे कुत्र्याचा द्वेष करणाऱ्या एक सायको किलरचा हात असावा, असा संशय आहे. सर्व कुत्र्यांचे मृतदेह काढून दफन केले. त्यांच्या शवविच्छेदनाची  मागणी केली आहे. आम्हाला खात्री आहे की आरोपी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी आणि अज्ञात आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही तपासण्याची विनंती केल्याचे पाठक यांनी नमूद केले.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई