Join us

कांदिवलीत महिलांचा कचऱ्याविरोधात लढा!

By admin | Published: January 24, 2017 6:11 AM

एकीकडे ‘स्मार्ट सिटी’कडे मुंबई वळत असताना, अजूनही शहर-उपनगरातील कचऱ्याची समस्या मोठी आहे. ठिकठिकाणी डम्पिंग

मुंबई : एकीकडे ‘स्मार्ट सिटी’कडे मुंबई वळत असताना, अजूनही शहर-उपनगरातील कचऱ्याची समस्या मोठी आहे. ठिकठिकाणी डम्पिंग ग्राउंड असूनही, कचऱ्याच्या प्रदूषणात दिवसागणिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कांदिवली चारकोप सेक्टर एकमधील महिलांनी कचऱ्याच्या समस्येचे उच्चाटन करण्याची अनोखी चळवळ हाती घेतली आहे. त्यात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणावर भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी येथील महिला एकवटल्या आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशनच्या पुढाकाराने कांदिवली चारकोप सेक्टर एक येथील २९ निवासी वसाहतींमध्ये व्यापक कचरा व्यवस्थापनाविषयीचा प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत येथील जवळपास १ हजार ५० घरांमध्ये सुका व ओला कचरा वेगळा टाकण्यासाठी कचराकुंड्यांचे वाटप केले आहे. या माध्यमातून कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि पुनर्वापर याविषयीचे विशेष प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून येथील स्थानिक महिलांना देण्यात आले आहे.या प्रकल्पाच्या निमित्ताने सोमवारी चारकोप सेक्टर एक येथील आर्य समाज सभागृहात सायंकाळी हळदीकुंकुवाचा कार्यक्रम पार पडला. यात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू समारंभात देण्यात येणाऱ्या वाण परंपरेतून वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला. यात संस्थेच्या सहाय्याने सहभागी प्रत्येक महिलेला वाण म्हणून महिला बचत गटाने तयार केलेल्या कापडी पिशव्या दिल्या. या माध्यमातून प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी, शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशनच्या संस्थेच्या संचालक प्रज्ञा ठाकूर, प्रकल्पासाठी टास्क फोर्सचे प्रमुख प्रमोद गुजर, कांदिवलीचे सहायक पालिका आयुक्त साहेबराव गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)