मुंबई : कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या किरण हिंमतमल सिंघवी या १७ वर्षीय मुलीने ३० सेकंदांमध्ये तब्बल १०२ स्किपींग म्हणजेच दोरीवरच्या उड्या मारुन जागतिक विश्वविक्रम केला आहे. यानिमित्त वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाच्यावतीने किरण व तिचे प्रशिक्षक मनोज गौंड यांचा सत्कार करण्यात आला. वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाचे सीनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र आणि मेडल देऊन त्यांचा कांदिवली येथे सत्कार करण्यात आला.
विश्वविक्रम करणाऱ्या किरण सिंघवी हिचे आपण जागतिक स्तरावर काहीतरी वेगळे करून दाखवायचे, असे वयाच्या सहाव्या वर्षापासूनचे स्वप्न होते. ते स्वप्न तिने तीस सेकंदांमध्ये १०२ दोरीवरच्या उड्या मारून पूर्ण केले, असे तिचे म्हणणे आहे. किरणचे प्रशिक्षक मनोज गौंड १८ वर्षांहून जास्त काळापासून मुलांना कराटे व मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहेत. आजच्या तरुण पिढीने आपला मौल्यवान वेळ हा आपल्यामध्ये लपलेल्या टॅलेंटला आकार देण्यासाठी वापरावा आणि पालकांनीही त्यांना प्रोत्साहित करावे. तरच आजची तरुण पिढी खऱ्या अर्थाने यशस्वी होईल, असे मत सुषमा संजय नार्वेकर यांनी व्यक्त केले.