मनोहर कुंभेजकर
मुंबई : कोरोनामुळे गेल्या दि, 22 मार्च पासून सुरू झालेला लॉकडाऊन सध्यातरी येत्या 3 मे पर्यंत आहे. देशातील सर्वच नागरिक घरातच कुटुंबा बरोबर आहे. घरात बसून बोर झाला, कंटाळा आला असे सुरू अनेकांकडून ऐकायला येतात. लॉकडाऊनचा मोठा कालावधी आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रथमच आला आहे. कोरोनवर मात करण्यासाठी घरातच राहून लॉकडाऊनचा सदुपयोग करत हाडाची आर्टिस्ट असलेली कांदिवलीची महालक्ष्मी वानखेडकर पक्ष्यांच्या विश्वात विश्वात रमली आहे. मकाव या चे चित्र काढण्यात त्या रमल्या असून वेळमिळेल तसा रोज सुमारे 5 ते 6 तास कॅनव्हास पेंटिंग करते अशी माहिती त्यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात माझे लक्ष माझ्या कलेकडे वळविले. अमेझॉन मधील घनदाट जंगलात असणाऱ्या मकाव या पक्ष्यांच्या चित्र काढण्यात लक्ष केंद्रित केले. माझ्या पक्षांशी मी सवांद साधत चित्र काढत असल्यामुळे ध्यानधारणा होत असते. माझे पक्ष्यांबरोबरचे विश्व खूपच अप्रतिम आहे. त्यांचं ते प्रातःकाळी मधुर गीत गात दिवसाची सुरुवात करणं, आकाशात उंच भरारी घेत उडणं, मोकळा श्वास घेत निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंदी राहणं, नकळतपणे निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणं मनाला खूप भावतं असे त्यांनी लोकमतला सांगितले.
महालक्ष्मी या एक कलाकार आणि साइंटिस्ट आहे, शिक्षण जे. जे. स्कुल ऑफ आर्टस मध्ये झाले. गेली २० वर्षे त्या कागदापासून सूक्ष्म कात्रण करून पक्ष्यांच्या व निसर्गाच्या कलाकृती बनवितेय. त्यासाठी 2017 मध्ये 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शने झाली व अनेक पुरस्कार प्राप्त झालीत. (कागदांचे सूक्ष्म कात्रण करून पक्ष्यांची व निसर्गाची कलाकृती साकारणारी 'जगातील पहिली महिला' म्हणून नोंद झाली.) तसेच आयुर्वेदातील संशोधनात भारत सरकार कडून चार पेटंट मिळाले आहेत.
खूपच मंजुळ आवाजाने पहाटे जाग आली. पाहिले तर अडीच वाजले होते. आतापर्यंत ब्रह्ममुहूर्तावर उठणारे पक्षी अडीच वाजताच गात होते. प्रथमच मी fantail (नाचण) चा एवढा सुमधुर आवाज ऐकत होते. बुलबुल, शिंपी, भारद्वाज, नाचण,पोपट, कावळा, चिमण्या, पावशा, खंड्या, साळुंकी इत्यादी विविध पक्षाचे आवाज दिवसभरात येत होते. हे सर्व विविध पक्षी मंजुळ स्वरात ब्रह्ममुहूर्तावर प्रार्थना गीत म्हणत आहेत की काय? असे वाटले.म्हणत असतील की, "हे देवा, हे निरभ्र आकाश, स्वच्छ हवा, स्वच्छंदी जीवन असेच कायम राहू दे." त्या बिचा-र्यांना या मागचे खरे कारण कुठे माहित आहे?असा सवाल त्यांनी केला.तर हल्ली चिमण्यांच्या किलबिलाट सुध्दा कानी पडत नव्हता. आज बऱ्याच वर्षांनी हा पक्षांचा किलबिलाट ऐकला असे त्यांनी सांगितले..
जगभरातल्या ५७०२ पक्षी प्रजातींमध्ये ७८५ पक्षी भारतात आहेत. महाराष्ट्रात ३३३ पक्ष्यांची नोंद झाली आहे. भारतातील जवळजवळ १५ पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याकडे स्थलांतरित पक्षांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. या सर्वांचे कारण प्रदुषण, वृक्षतोड, लोकसंख्या, अन्नाचा तुटवडा, कीटकनाशके, रासायनिक खते, मोबाईल टॉवर व मोबाईल मधून येणाऱ्या लहरी आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
पृथ्वीवर असणाऱ्या सर्व सजीवांचे जीवन सारखेच आहे. फक्त आपण आपल्या गरजा वाढविल्यात, नाहीतर निसर्गाने सर्व काही दिलंय आपल्याला. मानव सोडला तर सर्व जीव निसर्ग नियमानुसार जगत आहेत. निसर्ग आपल्याला ऑक्सिजन पासून औषधांपर्यंत सर्व काही पुरवत आहे. हे फक्त प्राणी पक्ष्यांनाच समजतं का? मानवाला का समजू नये? प्राणी पक्षी सुद्धा आजारी पडतात, ते सुद्धा स्वतःच्या आजारांची औषधे निसर्गाकडूनच घेतात ना?असा सवाल त्यांनी केला.उदाहरणार्थ, मकाव हे पक्षी अँमेझॉन खोऱ्यात राहतात. पावसाच्या दरम्यान ते डोंगर कपारीतील चिखल खातात. ह्या चिखलात जे खनिज आहेत, ते मकावच्या आजारावरील औषध आहे. कुत्रा सुद्धा पोट बिघडल्यावर किंवा उलटी करावयाची असल्यास गाजरी गवत खातो.म्हणजेच पशु पक्षांना सुद्धा नैसर्गिक औषधांचे ज्ञान उपजतच आहे अशी माहिती त्यांनी दिली.
आपणही जर आज पर्यावरण संतुलन राखण्यास हातभार लावला तर आज जी कोरोनाजन्य परिस्थिती आहे, त्यावर आपण मात करू शकतो.प्रत्येकाजवळ काही ना काही ज्ञान आहेच, आपण योगसाधनेने आपली ईच्छाशक्ति वाढवून सद्य परिस्थितीवर मात करूया. नव्या जोमाने आपली कार्यक्षमता वाढवून देशाची आर्थिक घडी बसविण्यासाठी हातभार लावूया आणि आपले आयुष्य सुखमय करूया असे मत शेवटी महालक्ष्मी वानखेडकर यांनी व्यक्त केले.