मुंबई : एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात कांदिवली केंद्राने जबरदस्त आक्रमक खेळ करताना चर्चगेट केंद्राचे आव्हान ३-० असे परतावून आंतर केंद्र फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. बिपीन फुटबॉल अकादमीच्या वतीने नुकताच कर्नाटक फुटबॉल अकादमीच्या मैदानवर झालेल्या या सामन्यात कांदिवली संघाने एकहाती वर्चस्व राखले. एकूण आठ केंद्रांमध्ये झालेल्या या स्पर्धेत कांदिवली संघाने सुरुवातीपासून राखलेला विजयी धडाका अखेरपर्यंत कायम राखला. धीरेन पटनी, जॉन्सन मॅथ्यू आणि ॠणाल पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या जेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले.चर्चगेटने मध्यंतरानंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कांदिवलीच्या भक्कम बचावापुढे त्यांना अपयश आले. तत्पूर्वी, उपांत्य सामन्यात कांदिवली संघाने विरार केंद्राचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ८-७ असा पराभव केला होता. दुसरीकडे चर्चगेट संघाने कुलाबा केंद्राचा ३-० असा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली होती. (क्रीडा प्रतिनिधी)इतर पुरस्कार : फेअर प्ले : कुलाबा केंद्र, सर्वोत्कृष्ट खेळाडू : ॠणाल पाटील, संघनिहाय सर्वोत्कृष्ट खेळाडू : जस्टीन डायस (अंधेरी), अनास खान (कल्याण), यश सोळंकी (मुंबई महानगरपालिका), मालव त्रिवेदी (मुलुंड), करण प्रजापती (विरार), शेल्डन फर्नांडिस (चर्चगेट), फैझल शेख (कुलाबा) आणि जॉन्सन मॅथ्यू (कांदिवली).
कांदिवली केंद्र ठरले ‘चॅम्पियन’
By admin | Published: January 03, 2017 11:57 PM