महिला अभियंत्याला कांदिवलीत मारहाण
By Admin | Published: June 5, 2016 03:12 AM2016-06-05T03:12:23+5:302016-06-05T03:12:23+5:30
अनाधिकृतपणे सुरू असलेल्या बांधकामाचे फोटो घेत असताना, पालिकेच्या एका महिला अभियंत्यासह दोघांना मारहाण करण्याची घटना कांदिवली येथील आर दक्षिण विभागात घडली.
मुंबई : अनाधिकृतपणे सुरू असलेल्या बांधकामाचे फोटो घेत असताना, पालिकेच्या एका महिला अभियंत्यासह दोघांना मारहाण करण्याची घटना कांदिवली येथील आर दक्षिण विभागात घडली. या प्रकरणी गोपाल वंझारा, पारू वंझारा व रूपा वंझारा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पालिकेच्या आर दक्षिण विभागात कोमल भोई या इमारत खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कांदिवलीच्या सागवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या मुकादम भोरे यांच्यासोबत तेथे गेल्या. अनधिकृत बांधकामाचे फोटो घेत असताना, गोपाल वंझाराने शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केली, तर त्याच्यासोबतच्या पारू व रूपा यांनी त्यांचे केस ओढून बुक्क्यांनी मारहाण केली. मुकादम भोरे यांनाही धक्काबुक्की केली.
मारहाणीमुळे कोमल भोई जखमी झाल्याने, त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा, शासकीय सेवकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून, त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)