Join us

महाराष्ट्र नेचर पार्क येथे होणार कांदळवन संशोधन व प्रशिक्षण केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 12:28 AM

माहिम येथील महाराष्ट्र नेचर पार्क येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १.५ एकर जागा कांदळवन कक्षास त्वरित हस्तांतरित केली जावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एमएमआरडीएला दिले आहेत.

मुंबई : माहिम येथील महाराष्ट्र नेचर पार्क येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १.५ एकर जागा कांदळवन कक्षास त्वरित हस्तांतरित केली जावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. एमएमआरडीएकडून रीतसर जागा उपलब्ध झाली, तर त्वरित काम सुरू केले जाईल, असे कांदळवन विभागाचे म्हणणे आहे.कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी २०१२ साली वन विभागांतर्गत स्वतंत्र कांदळवन कक्षाची निर्मिती करण्यातआली.या कक्षामार्फत कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाची कामे सातत्याने केली जात आहेत. यासंबंधीची जनजागृतीही करण्यात येत आहे. यामुळेच २०१५ ते २०१७ या कालावधीत राज्यात कांदळवनाचे क्षेत्र ८२ चौरस किलोमीटरने वाढले आहे. कांदळवन संरक्षण आणि संवर्धनात या कालावधीत देशात राज्य प्रथम क्रमांकावर आले असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.कांदळवनाच्या विविध प्रजातींच्या रोपवाटिका, आर्बेटरियम, सर्वसमावेशक कांदळवन माहिती केंद्र, ग्रंथालय, प्रशिक्षण व त्यासाठीची निवास व्यवस्था इत्यादी कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी महाराष्ट्र नेचर पार्क येथील १.५ एकर जागा देण्याबाबत वन विभागाने एमएमआरडीएकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यास एमएमआरडीएच्या ठरावान्वये मान्यताही देण्यात आली आहे. त्यानुसार हे १.५ एकरचे क्षेत्र कांदळवन कक्षाकडे लवकरच हस्तांतरित केले जावे, अशा सूचना वनमंत्र्यांनी दिल्या.वनविभागाने एमएमआरडीएकडे हा प्रस्ताव पूर्वीच पाठविला होता. आता वनमंत्र्यांनी १.५ एकरची जागा कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहे. कांदळवन कक्षाकडे जागा हस्तांतरित झाल्यावर कांदळवन संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांने दिली.

टॅग्स :सुधीर मुनगंटीवार