Join us

कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल; बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 12:14 AM

सोनिया गांधींकडे केली हस्तक्षेपाची मागणी

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने शुक्रवारी शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करून शिवसेनेवर हल्लाबोल केला. ‘महान नेते असलेले बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडीच्या नेत्यांपैकी आणि आदर्शांपैकी एक होते. कधी तरी शिवसेना गटातटाच्या राजकारणात सामील होईल आणि काँग्रेस बनेल, अशी भीती त्यांना वाटायची. आता त्यांच्या पक्षाची सध्याची स्थिती पाहून त्यांची भावना काय असली असती’, अशा आशायाचे ट्विट तिने केले.

कंगनाने मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचे म्हणत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यावर शिवसेनेने तिच्यावर टीकास्त्र सोडले. त्यातून वाद पेटला. शिवसेनेने हा विषय आमच्यासाठी संपला असे म्हटले असले तरी कंगना मागे हटायला तयार नाही. शिवसेनेवर टीका करतानाच तिने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही काही प्रश्न केले.

‘प्रिय आणि सन्मानीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तुम्ही एक महिला आहात. मग महाराष्ट्रातील तुमचे सरकार माझ्यासोबत करत असलेल्या वर्तुणुकीचा तुम्हाला राग येत नाही का? तुमचे सरकार महिलेवर अन्याय करत आहे, कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवत आहे. तुम्ही आता बोलले पाहिजे. मला आशा आहे की तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप कराल.

कंगनाला नुकसानभरपाई मिळायला हवी - आठवले

कंगना रनौतच्या कार्यालयावर महापालिकेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. नियमांचे उल्लंघन करून ती करण्यात आल्याने कंगनाला नुकसानभरपाई मिळायला हवी, अशी मागणी आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. आठवले यांनी शुक्रवारी सकाळी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. यावेळी कंगनाला नुकसान भरपाई मिळावी, कोरोना आणि कोझिकोड विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले कॅप्टन दीपक साठे यांच्याबाबत त्यांनी चर्चा केली.

टॅग्स :कंगना राणौतबाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेना