मुंबई - मुंबईमेट्रोसाठीआरेमध्ये नियोजित असलेल्या कारशेडची जागा बदलून ती कांजूरमार्ग येथे करण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकारकडून आज शिक्कामोर्तब करण्यात आले. विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला असतानाच, आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनेही या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. श्रीमंताना सोयीस्कर व्हावं, यासाठी शहराचा विकास थांबवण हे या प्रश्नाचं उत्तर नाही, असे म्हणत कंगनाने सरकारच्या निर्णयावर टीका केलीय.
आरेतीलमेट्रो कारशेडची जागा बदलण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही घणाघाती टीका केली आहे. मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. फडणवीस यांच्यासह आता अभिनेत्री आणि गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत वाद सुरू असलेली अभिनेत्री कंगना राणौतनेही राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केलीय.
''काही फॅन्सी आंदोलकांचे प्रश्न हे सर्व मुंबईकरांचे प्रश्न होऊ शकत नाहीत. गेल्यावर्षी मी स्वत: 1 लाख झाडं लावली आहेत. झाडं तोडणं हे चूकच आहे. पण, काही श्रीमंताना सोयीस्कर व्हावं यासाठी शहराचा विकास थांबवणं हे या प्रश्नाचं उत्तर नाही,'' असे ट्विट कंगनाने केले आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालायवर हातोडा मारला होता. त्यानंतर, कंगना शिवसेनेविरोधात आक्रमक झाली असून सरकारच्या विविध निर्णयावर आपलं मत मांडताना दिसून येत आहे. कंगना ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका करते.
4000 कोटींचा अतिरिक्त भुर्दंड
मेट्रोची आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर फडणवीस यांनी ट्विट करून टीका केली. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले होते.
म्हणजे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी 400 कोटी आधीच खर्च झालेले आणि स्थगितीमुळे 1300 कोटी पाण्यात गेले. शिवाय 4000 कोटींचा वाढीव भार पडणार आहे. तसेच कांजूरमार्ग येथील जागेचा वाद कायम राहिल्यास 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. आज त्यात आणखी किती वाढ होणार? एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार आहे. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? जनतेची किती मोठीही दिशाभूल आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
आरे मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. एक म्हणजे आरेतील जागा जंगल घोषित केली आहे. आधी 600 एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून 800 एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत 800 एकराचे जंगल असणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, आरेचे जंगल टिकवणे आपले काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे आरेतील प्रस्तावित मेट्रोचे कारशेड आता कांजूरमार्गला करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता आरेमध्ये मेट्रोचे कारशेड होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'कांजुरची जमीन शून्य रुपये किंमतीने सरकारने दिलेली आहे. त्यावर आता मेट्रो कारशेड उभे राहणार आहे. आरे जंगलात साधारण 100 कोटींचा खर्च करून एक बिल्डिंग उभारली आहे. ते पैसे वाया जाणार नाहीत. बिल्डिंग अन्य कारणासाठी वापरणार आहोत. या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील. एकही पैसा वाया जाऊ देणार नाही. तसेच, आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी सांगितले.