कंगनाची भीती व्यर्थ, अर्ज न्यायालयाने फेटाळला; जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 06:42 AM2022-03-19T06:42:22+5:302022-03-19T06:42:29+5:30
९ मार्चला न्यायालयाने कंगनाचा खटला वर्ग करण्याचा अर्ज फेटाळला.
मुंबई : नि:ष्पक्ष खटला न चालण्याची भीती वाजवी असावी लागते, असे दुसरे अतिरिक्त प्रधान न्या. श्रीधर भोसले यांनी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दावा अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून अन्य न्यायालयात वर्ग करण्याचा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा अर्ज फेटाळताना म्हटले.
९ मार्चला न्यायालयाने कंगनाचा खटला वर्ग करण्याचा अर्ज फेटाळला. त्याबाबत दिलेल्या आदेशाची प्रत उपलब्ध झाली. बाह्य विचारांनी प्रभावित न होता योग्य व निष्पक्ष न्याय देणे, हा गुन्हेगारी खटल्यांचा हेतू आहे. जेव्हा लोकांचा खटल्याच्या निष्पक्षतेवर विश्वास कमी होईल, तेव्हा कोणताही पक्ष खटला अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी करू शकतो. मात्र, खटला योग्य व निष्पक्षपणे चालविला जाणार नाही, ही भीती वाजवी व अनुमानावर आधारित असली पाहिजे. काल्पनिक आणि तर्कसंगत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
एखादे न्यायालय फौजदारी न्याय नि:ष्पक्षपणे किंवा वस्तुनिष्ठपणे करू शकत नसल्याचे दिसून आले तर तो खटला वर्ग केला जाऊ शकतो. सदर प्रकरणी न्याय मिळणार नाही, या केवळ भीतीमुळे खटला वर्ग केला जाऊ शकत नाही. कोणताही पक्षपातीपणा न करता न्याय मिळणार नाही, अशी भीती दाखविणारी सामग्री नसताना खटला वर्ग करण्याचा अर्ज मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने कंगनाचा अर्ज फेटाळताना म्हटले.
खटला वर्ग करण्यासंदर्भात एकामागून एक अर्ज करण्यात आले आणि त्या अर्जांवर दंडाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला नाही तसेच कंगनाला न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले म्हणून संबंधित दंडाधिकारी पक्षपातीपणा करत होते, असे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.