कंगणा डोक्यावर पडलीय पण; आव्हाडांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही खडसावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 07:12 PM2021-11-13T19:12:21+5:302021-11-13T19:13:23+5:30
अनेकांनी तिच्या विधानावरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही तिच्या विधानावर टाळ्या वाजवणाऱ्यांनाही चांगलंच सुनावलंय.
मुंबई - भारताला १९४७ साली भीक मिळाली व स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अकाली दल, राष्ट्रीय जनता दल असे सारेच पक्ष उभे ठाकले आहेत. तिचा पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपतींनी काढून घ्यावा आणि तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी जोरदार मागणी या राजकीय पक्षांनी केली आहे. अनेकांनी तिच्या विधानावरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही तिच्या विधानावर टाळ्या वाजवणाऱ्यांनाही चांगलंच सुनावलंय.
कंगना राणौतच्या विधानाचं मला काहीच आश्चर्य वाटत नाही. ती डोक्यावर पडलीय. पण, टाळ्या वाजवणाऱ्या निर्लज्ज प्रेक्षकांचे काय?. कंगनाला दिलेल्या लोकांच्या प्रतिसादाबद्दल आज जग आपल्यावर हसतंय, अशा शब्दात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाच्या विधानावर टाळ्या वाजवणाऱ्या लोकांबद्दल संताप व्यक्त केलाय.
Whatever #KanganaRanaut does not surprise me … she has fallen on head
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 13, 2021
But wat about the shameless audience who r seen clapping …
The world is laughing at us for the responses to #kanganaranuat
महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी कंगनाच्या विधानाचा धिक्कार केला आहे. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी यापुढे कोणालाही असे पुरस्कार देण्याआधी त्यांची मानसिक तपासणी करावी, अशी मागणी करून, कंगनाच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच पंतप्रधानांनी तिच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीत भाजपनेही केला कंगनाचा निषेध
दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनीही कंगनाचा निषेध केला आहे. मुंबईत काँग्रेसचे नसीम खान म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. कंगनासारख्या बेताल व्यक्तीने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. कंगनाच्या या वक्तव्याचा भाजप नेत्याने निषेध केला नाही. त्यामुळे या वक्तव्यामागे केंद्रातील भाजप सरकारचे षडयंत्र असण्याची शक्यता असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी केला.