जावेद अख्तरांच्या मानहानी दाव्याविरोधात कंगना रनौत उच्च न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:17+5:302021-07-22T04:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्यावर अंधेरी न्यायदंडाधिकारी यांनी केलेली कारवाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्यावर अंधेरी न्यायदंडाधिकारी यांनी केलेली कारवाई रद्द करण्यात यावी, यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
जावेद यांनी केलेल्या दाव्यासंबंधी पोलिसांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली. त्यांनी स्वतंत्र साक्षीदार तपासले नाहीत, असे कंगना हिने अपिलात म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगनाने आपली बदनामी केली व वाट्टेल तसे तथ्यहीन आरोप केले, असे जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात केलेल्या मानहानी दाव्यात म्हटले आहे.
डिसेंबर महिन्यात न्यायदंडाधिकाऱ्यांनी जुहू पोलिसांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार, प्रथमदर्शनी अख्तर यांनी केलेल्या आरोपांत तथ्य आहे. मात्र, आणखी तपास आवश्यक आहे. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई करत कंगना हिला फेब्रुवारी २०२१ मध्ये समन्स बजावले.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारांचा वापर करून स्वतंत्र चौकशी करायला हवी. परंतु, त्यांनी पोलीस यंत्रणेचा वापर केला. हे कधीही ऐकिवात नाही, असे कंगनाच्या याचिकेत म्हटले आहे
पोलिसांनी काही साक्षीदारांवर दबाव आणला. न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांचा जबाब शपथेवर नोंदवायला हवा होता, असे अपिलात म्हटले आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.