मुंबई : कंगना रनौतच्या पाली हिल येथील बंगल्यावरील कारवाई प्रकरणात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता व खासदार संजय राऊत व पालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाटे यांना उत्तर दाखल करण्याची उच्च न्यायलायने मुभा दिली. मात्र, लाटे यांच्या वकिलांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करताच उच्च न्यायालयाने पालिकेला व लाटे यांना चांगलेच सुनावले. आता या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
कंगना रनौत हिने पालिकेने आपल्या पाली हिल येथील बंगल्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हणत पालिकेकडून दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती.
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आपल्या बंगल्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप करत कंगना हिने संजय राऊत यांनाही या प्रकरणात न्यायालयात खेचले आहे. त्यांच्याबरोबर पालिकेच्या एच/पश्चिम प्रभागाचे अधिकारी भाग्यवंत लाटे यांनाही या प्रकरणी प्रतिवादी केले आहे. गुरुवारच्या सुनावणीत संजय राऊत यांच्यावतीने ऍड. प्रदीप थोरात यांनी न्यायालयाला सांगितले की, संजय राऊत हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे उत्तर सादर करण्यासाठी थोडा वेळ द्यावा. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली. तर लाटे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनीही प्रतिज्ञापत्र सादर करण्यास मुदत मागत शुक्रवारची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलण्यास नकार दिला. बंगला अंशतः तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही. पावसाळा सुरू असल्याने सुनावणी अधिक लांबवू शकत नाही. त्यामुळे सुनावणी शुक्रवारीच होणार. 'कारवाई ज्या पद्धतीने करण्यात आली आहे, ते योग्य नाही. कारवाई करण्यास तत्पर असता आणि उत्तर द्यायची वेळ आल्यावर मुदत मागता,' अशा शब्दांत न्यायालयाने पालिका व लाटे यांना फटकारले. मात्र, लाटे यांना उत्तर देण्यास मुदत दिली.
कंगना रनौत हिच्या वांद्रे येथील पाली हिलमधील बंगला मंजूर केलेल्या आराखड्यानुसार नसून तिने बंगल्यात काही अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करत पालिकेने ९ सप्टेंबर रोजी तिच्या बंगल्यावर कारवाई केली. त्याविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.